महसूल पथकाला डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न
माय अहमदनगर वेब टीम
पारनेर - अवैध वाळू उपसा करून वाहतूक करत असलेल्या डंपरचा पाठलाग करणार्या महसूल पथकाच्या वाहनावर वाळूचा डंपर घालून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री ढवळपुरी येथील भोंडवे वस्ती नजीक घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या फिर्यादीवरून भाळवणी येथील अक्षय पाडळे,आकाश रोहकले व बापू सोनवणे या तीन वाळू तस्करांवर सरकारी कामात अडथळा व गौण खनिज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील भोंडवे वस्ती जवळ अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर चालला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांना समजली .त्यांनी सोबत कर्मचारी सचिन पोटे, लक्ष्मण बेरड, परमेश्वर राजुरे, अमोल मंडलिक, शशिकांत दोरे यांच्यासह सदरील ठिकाणी छापा टाकून वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी डंपर चालकाने महसूल पथकाच्या वाहनावर डंपर घालून चिरडण्याचा प्रयत्न करत डंपर सुसाट नेला.मात्र महसूलचे पथक पाठलाग करत असल्याचे पाहून डंपर चालक व त्यांच्या सहकार्यांनी वाळूने भरलेला डंपर रस्त्यातच सोडून महसूल पथकातील कर्मचार्यांना धक्काबुक्की करत पळून गेले. या प्रकरणी मंगळवारी पारनेर पोलिस ठाण्यात तहसीलदार ज्योती देवरे यांच्या फिर्यादीवरून भाळवणी येथील अक्षय पाडळे, आकाश रोहकले व बापू सोनवणे या तीन वाळू तस्करांवर सरकारी कामात अडथळा आणणे व गौण खनिज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि .राजेश गवळी यांच्यासह पोलिस करत आहेत.
Post a Comment