दरोडेखोरीच्या गुन्ह्यात नगरचे दोघे जेरबंद
माय नगर वेब टीम
अहमदनगर – राहुरीत दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीस पोलिसांनी जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीत भिंगार व सावेडी येथील दोन युवक आहेत. ही घटना आज सोमवारी (दि.25) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गोकुळ कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी पोकॉ.आदिनाथ महादेव पाखरे यांनी फिर्याद दिली आहे.
सागर गोरख मांजरे (रा. पाईपलाईन रोड, सावेडी), अविनाश अजित नागपुरे (वय 20, रा. भिंगार), काशिनाथ मारुती पवार (ता. संगमनेर), गणेश मारुती गायकवाड (ता. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गॅस कटर, सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, तलवार, टॉमी, कटावणी, मोबाईल, दोन दुचाकी असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
याबाबत माहिती अशी की, गोकुळ कॉलनी येथील एका मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी टोळी आल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्याआधारे पीआय मुकुंद देशमुख, एपीआय यशवंत राक्षे, कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाये, सुशांत दिवटे, रवींद्र मेढे, अमित राठोड, गृहरक्षक दलाचे जवान सतीश कुलथे, ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यास सुरूवात केली. अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी धूम ठोकली.
रोडवरून पळत असतांना एक जण तोंडावर आपटला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अन्य दरोडेखोरांचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला. व्यापारी पेठेत एकाला राहुरी खुर्दच्या मुळा नदीवरील पुलाच्या जवळ, एकाला राहुरी फॅक्टरीच्या दिशेने धसाळ पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी पकडले. चारचाकी वाहनातून दोन जण पसार झाल्याचे समजते. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment