साईबाबा संस्थान विश्‍वस्तपदी कोणाची वर्णी लागणार ?




माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी – शिर्डी साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळाची मुदत संपून 5-6 महिने झालेले असतानाही ही निवड विधानसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलली गेली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे या संस्थानच्या विश्‍वस्तपदी कोणाकोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडीसाठी जिल्ह्यातून अनेक मान्यवरांची नावे यादीत समाविष्ट आहेत.

संस्थानच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासह विश्वस्त पदावर विराजमान होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले दिसत आहे. असे असले तरी साईभक्त कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून साईबाबा संस्थानवर अंकुश आणला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विश्वस्त मंडळ निवडीच्या प्रक्रियेला न्यायालयाने काही नोंदी करून दिलेल्या आहेत. न्याय मंत्रालय आणि न्यायालयाच्या नोंदीनुसार निवडी होतील. त्या निवडीत आपण बसतो की नाही याची पडताळणी अनेकांनी स्वतःहून केलेली आहे.

सिद्धिविनायक देवस्थान शिवसेनेच्या वाट्याला जर गेले तर शिर्डी देवस्थान अध्यक्ष, उपाध्यक्षपद काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते. या पूर्वीचा इतिहास बघता स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून अध्यक्षपद भोगले होते तर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी उपाध्यक्षपद भोगलेले आहे. नव्याने आलेल्या सरकारच्या निर्णयानुसार व धोरणाने जर ठरले तर साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद हे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडे जाईल. हे अध्यक्षपद आपल्याच पदरात पडावे म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांमध्ये चांगलीच चुरस व स्पर्धा निर्माण होणार आहे.

जिल्ह्यात भाजपाचे दोन नवनिर्वाचित आमदार वगळता उर्वरित आमदार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत तर शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे एक आमदार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनिष्ठता जपलेल्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करायचे की नव्याने निवडून आलेल्या आमदारांना यावर संधी द्यायची हा हा पक्षांतर्गत प्रश्न जरी असला तरी कार्यकर्त्यांना मात्र यात सामावून घ्यावे लागणार आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे शिवसेनेचे लोकही या विश्वस्त पदाच्या खुर्चीवर विराजमान होऊ शकतात.

एकंदरित साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाची संख्या विचारात घेता जर ही पदे विभागली गेली तर संस्थान विश्वस्त संख्येपैकी तीन भाग होतील. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपद काँग्रेस व राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके इतरही उर्वरित दावेदार मानले जातात दक्षिणेतला विचार केला तर श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार, पाथर्डीचे प्रतापराव ढाकणे यांनाही संधी देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस विचार करू शकतेे. मात्र असे असले तरी सध्याचा राजकीय परिस्थितीचा विचार केला तर साईबाबा संस्थानच्या निवडीत बाळासाहेब थोरात यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिवसेनेच्यावतीने प्रामुख्याने शिर्डी शहराचा विचार केला तर राष्ट्रवादीचे निलेश कोते, राकेश कोते, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर तर शिवसेनेचे कमलाकर कोते, सचिन कोते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जगताप, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विचार केला तर काँग्रेसचे सत्यजित तांबे, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक अशी नावे चर्चेत येऊ शकतात. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राहाताचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, कोपरगावचे राजेंद्र झावरे यांच्यासह इतरही नावे चर्चेत आहेत.

साईभक्तांमध्ये इच्छा बघता सबका मालिक एक असलेल्या साईबाबांच्या दरबारात किमान पक्ष न बघता सेवा करणार्‍या आणि शिर्डीचे भलं करणार्‍या साईभक्तांना आज खर्‍या अर्थाने विश्वस्तपदाची जबाबदारी द्यावी. मात्र हे जरी खरे असले तरी औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानुसार साईबाबा संस्थान विश्वस्त पदावर उच्च न्यायालयाने दिलेल्या अटीशर्तीनुसारच नियुक्ती करण्यात येणार असल्याने यामध्ये कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.साईबाबांच्या शिर्डीत ही अनेक साईभक्त असून नि:स्वार्थीपणे साईबाबांची सेवा करत आहेत. त्या त्या सेवेच्या बळ देण्यासाठी नवीन नियुक्त केल्या जाणार्‍या विश्वस्त मंडळात राजकीय व्यक्तींबरोबरच सामाजिक व साईबाबांच्या कार्यासाठी झोकून देणार्‍या व्यक्तींचाही विचार व्हावा अशीही मागणी भक्तांमधून यानिमित्ताने होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post