..लिलाव नसताना 38 कोटींची वसुली
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यातील गेल्या वर्षीप्रमाणे एकही यंदा देखील गत सात महिन्यांत वाळूलिलाव झालेला नसताना गौणखनिज विभागाने मागील वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण केले. यंदाही गेल्या सात महिन्यांत वाळूलिलाव नसताना 42 टक्के उद्दिष्टपूर्ती झालेली आहे. यंदाचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट 92 कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून, ऑक्टोबर अखेरपर्यंत सात महिन्यांच्या कालावधीत 38 कोटी महसूल वसुली झाली असल्याची माहिती गौणखनिज विभागाकडून देण्यात आली.
गौणखनिज रॉयल्टी आणि अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीपोटी दंडात्मक कारवाईतून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाळू, मुरूम व माती आदी गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीसंदर्भात दंडात्मक कारवाईतून 2019-20 या वर्षात 92 कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट जिल्हा खनिकर्म विभागाला देण्यात आले आहे.
या उद्दिष्टाच्या तुलनेत गत एप्रिल ते ऑक्टोबर अखेरपर्यंत म्हणजे सात महिन्यांच्या कालावधीत 38 कोटी 10 लाख रुपये (42 टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. आता उर्वरित पाच महिन्यांत म्हणजे मार्चअखेरपर्यंत राहिलेले 58 टक्के वसुली करण्याचे आव्हान गौण खनिज विभागाला असेल.
वाळूव्यतिरिक्त मुरूम, माती, डबर आदी इतर गौणखनिज चोरी प्रकरणातील कारवाईत ऑक्टोबरअखेर 41 वाहने पकडण्यात आली. त्यांच्याकडून 43 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. ही सर्व कारवाई गौण खनिज विभागाने केली. यात सर्वाधिक 13 वाहने नगर तालुक्यात पकडण्यात आली. त्यानंतर राहुरी 9, नेवासा 8, शेवगाव, श्रीगोंदा, राहाता प्रत्येकी 2 व कर्जतमध्ये 3 वाहनांवर कारवाई झाली.
1 कोटी 31 लाखांचा दंड
गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार व जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रशांत कोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथक गठित करण्यात आले आहे. या पथकामार्फत ऑक्टोबर अखेरपर्यंत अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात एकूण 204 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दंडात्मक कारवाईतून 1 कोटी 31 लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. यात 34 कारवाया पोलिसांनी, तर 37 कारवाया उपप्रादेशिक परिवहन खात्याने केल्या आहेत.
यंदापासून सरकारच्या आदेशनुसार पाच हेक्टरपर्यंतच्या पट्ट्याचा लिलाव एका ठेकेदाराला घेता येणार आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यंदा जिल्ह्यातील प्रमुख नद्या जादा पावसामुळे अजूनही प्रवाही असल्याने यंदा वाळू लिलाव आणि त्यानंतर उपशाची शक्यता धुसर असल्याची चिन्हे आहेत.
Post a Comment