शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिराची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये नोंद



माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी - साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा समाधी मंदिराची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन या जागतिक दर्जाच्या संस्थेने सर्वाधिक लोकांनी भेटी दिलेले मंदिर म्हणून सन्माननीय अशा वर्गवारीत जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली असून याबाबतचे पत्र संस्थानला प्राप्त झाले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री. मुगळीकर म्हणाले, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स हे जागतिक नेटवर्कसह ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि भारत येथे कार्यरत आहेत. जागतिक रेकॉर्डस्च्या माध्यमातून संभाव्य प्रतिभा आणि क्षमतांना ही संस्था आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रासह मान्यता प्रदान करते. त्याशिवाय मानवता आणि वैश्विक शांततेसाठी लक्षणीय सहभाग देणार्‍या व्यक्ती आणि स्थाने यांची नोंद घेऊन ही संस्था त्यांचा सन्मानही करते. श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता परदेशाच्या व देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्वाधिक भाविक शिर्डी येथे येतात. दररोज 50 ते 60 हजार भाविक भेट देत असून संस्थान उत्सव व सुट्टीच्या दिवशी ही संख्या एक लाखाहून अधिक असते. या बाबींची दखल घेऊन लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या समितीकडून श्री साईबाबा समाधी मंदिर भारतातील सर्वात जास्त लोकांनी भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक म्हणून यादीमध्ये नोंद केल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.

त्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडनच्या समितीने श्रीसाईबाबा समाधी मंदिराचा भारतातील सर्वाधिक भेट दिल्या गेलेल्या मंदिरांपैकी एक अशी नोंद केली आहे. ही एक धर्मनिरपेक्ष जागा असून येथे सर्व-धर्म-समभाव आहे आणि त्यापैकी श्रद्धा आणि सबुरी यांच्या शक्तीवर सर्वाधिक विश्वास केला जातो. ज्यांनी आपल्या शुद्ध समता भावनेतून मानवतेचा आणि शांततेचा असा ‘सबका मालिक एक’ हा मंत्र दिला त्या सामंजस्याचा खराखुरा खजिना असलेल्या दिव्य संतांचे हे स्थान आहे.

श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने ही भूमी एक पवित्र स्थान झाले आहे, असे कळविलेले असल्याचे सांगून लवकरच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकारी शिर्डीला येऊन हे नोंदणीपत्र संस्थानला बहाल करणार असल्याचेही श्री. मुगळीकर यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post