बहुमत होतं तर काळोखात शपथ का घेतली?; संजय राऊत यांचा सवाल
माय नगर वेब टीम
मुंबई - भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर आक्रमक झालेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. “अजित पवारांना फोडण आणि सरकार स्थापन करणं हा भाजपाचा डाव होता. तो त्यांच्यावर उलटला आहे. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे २५ आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करता असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं. पण, भाजपाकडं बहुमत होतं, त्यांनी काळोखात शपथ का?” असा सवाल संजय राऊत उपस्थित केला.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत यांनी भाजपानं आणीबाणीविषयी बोलण्याचा पोरखेळ करू नये, असं सांगत आरोपांचे बाण सोडले. राऊत म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री शपथ घेतो आणि हे राज्यातील जनतेलाच माहिती होत नाही. हे म्हणजे पाकिट मारणाऱ्या लोकांसारखच आहे. अजित पवारांना फोडणं आणि सरकार स्थापन करणं हा शेवटचा डाव होता. तो भाजपावर उलटला आहे. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे २५ आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करता येईल असं त्यांना वाटलं, त्यामुळेच भाजपानं त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं. काल सरकार स्थापन केल्यानंतर भाजपानं मोजक्या लोकांना पेढे आणि लाडू भरवले, पण ते त्यांच्या घशाखाली उतरलेले नाहीत,” असा चिमटाही राऊत यांनी भाजपाला काढला.
राज्यातील आमदारांच्या पळवापळवीवर बोलताना राऊत म्हणाले, “राज्यातील राष्ट्रपती राजवट पहाटे हटवण्यात आली. त्यानंतर भाजपाला सत्तास्थापनेचं राज्यपालांनी निमंत्रण दिलं. बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला २४ तासांचा वेळ दिला होता. मात्र, भाजपाला ३० नोव्हेंपर्यंतची मुदत देण्यात आली. भाजपानं राष्ट्रपती भवन आणि राज्यपाल भवनाचा काळा बाजार केला आहे,” असा आरोप राऊत यांनी केला.
Post a Comment