महाराष्ट्रानंतर शिवसेनेचा मोर्चा आता गोव्याकडे
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी भाजपच्या हातून मुख्यमंत्रिपद खेचून आणल्यानंतर, त्यांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. त्यांनी आज केलेल्या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गोव्यात भाजपचे सरकार पडणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्रानंतर आता शिवसेनेचं मिशन गोवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गोव्यात शिवसेना नवी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. तेथील विजय सरदेसाईंसह चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य संजय राऊतांनी केले.
संजय राऊतांनी "गोव्यात राजकीय भूकंप घडेल", असा इशारा भाजपला दिला आहे. 40 विधानसभा सदस्य असलेल्या गोव्यात सध्या भाजपच्या नेतृत्त्वात प्रमोद सावंत यांचे सरकार आहे. हे सरकार उलथवून टाकण्याचा इशारा संजय राऊथ यांनी दिला. ते म्हणाले की, "लवकरच गोमंतक पार्टीसोबत हातमिळवणी करुन आम्ही गोव्यात सरकार स्थापन करू. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई आणि 3 अन्य आमदार हे शिवसेनेसोबत युती करत आहेत. गोव्यात नवी युती आकाराला येईल. जे महाराष्ट्रात घडलं, ते गोव्यात घडेल. इतकंच नाहीतर आता हळूहळू प्रत्येक राज्यात आमचंच सरकार येईल", अशी गर्जना संजय राऊत यांनी केली.
Post a Comment