रब्बी हंगाम योजनेत सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - रब्बी हंगाम 2019-20 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी गहू बागायत (97 महसूल मंडळ), ज्वारी बागायत (89 महसूल मंडळ), आणि हरभरा (92 महसूल मंडळ) अधिसुचित महसूल मंडळ / मंडळ गटस्तरावर, विमा क्षेत्र घटक धरून राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांनी भाग घेण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2019 आहे.तर उन्हाळी भुईमूगासाठी 1 एप्रिल 2020 आहे.
नैसर्गिक आपत्ती, किड रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण देणे, पीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकर्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी पतपुरवठ्यात सातत्य राखणे ही या योजनेची उद्दिष्टेे आहेत. ही योजना अधिसूचित क्षेत्रातील कर्जदार शेतकर्यांना अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकर्यांचा सहभाग ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित करण्यात येते. चालू हंगामातील सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आल्यास नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा नुकसान भरपाई पिक विमा धारक शेतकर्यांना मिळू शकते. शेतकर्यांना टाळता न येण्याजोग्य कारणामुळे झालेल्या पीक नुकसानीस विमा संरक्षण मिळते.
प्रतिकुल हवामान परिस्थीतीमुळे अधिसूचित केवळ मुख्य पिकांची (जिल्हा / तालुका स्तरावर सरासरी क्षेत्राच्या 25 टक्के क्षेत्रावर पेरणी होणारे पीक) अधिसूचित क्षेत्रात सरासरी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी न होणे, पीक पेरणी पासून काढणीच्या कालावधीपर्यंत उत्पन्नात येणारी घट, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, काढणी पश्चात 14 दिवसापर्यंत शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे गारपिट, चक्रीवादळ व त्यामुळे आलेला पाऊस यामुळे झालेले नुकसान, स्थानिक नैसिर्गिक आपत्ती या बाबींचा काही अटी-शर्ती नुसार या योजनेत समावेश आहे. हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे पिक नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते.
पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम व कंसात शेतकर्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम पुढीलप्रमाणे. गहू (बागायत) – 32 हजार 500 रूपये (487.50 रूपये), ज्वारी (बागायत) – 28 हजार रूपये (420 रूपये), ज्वारी (जिरायत) – 26 हजार रूपये (390 रूपये), हरभरा – 24 हजार रूपये (360 रूपये), उन्हाळी भुईमूग – 25 हजार रूपये (375 रूपये), रब्बी कांदा 60 हजार (3000 रूपये).
शेतकर्यांनी पीक विमा अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे 7/12, 8अ उतारा, आधार कार्ड, बँक बचत खात्याचे पासबुक, अधिसूचित पीक पेरणी दाखला यासह व बिगर कर्जदार शेतकर्यांनी शेतात अधिसूचित पिकाची पेरणी केलेले स्वयंघोषणापत्रासह नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा. बँकेतील गर्दी टाळण्यासाठी बिगर कर्जदार शेतकरी सीएससी केंद्रातून आपले विमा अर्ज भरू शकतात. कर्जदार शेतकर्यांनी राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था / प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या शाखा यांच्याशी संपर्क साधावा.
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तालुके/पिकनिहाय मंडळ..
रब्बी ज्वारी (बागायत)- श्रीरामपूर-श्रीरामपूर, बेलापूर, टाकळीभान, उंदिरगाव. राहाता-राहाता, लोणी, बाभळेश्वर, शिर्डी, पुणतांबा. कोपरगाव-कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, पोहेगाव, दहिगाव बोलका. संगमनेर-संगमनेर, धांदरफळ बुद्रुक, घारगाव, डोळासणे, साकूर, पिंपरणे, आश्वी, सिबलापूर, तळेगाव, समनापूर. राहुरी- राहुरी, सात्रळ, ताहाराबाद, वांबोरी, ब्राम्हणी, देवळाली, टाकळीमिया. नेवासा-नेवासा, सलबतपूर, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, सोनई, चांदा, कुकाणा. पाथर्डी-पाथर्डी, माणिकदौंडी, करंजी, मिरी. शेवगाव- शेवगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव शे., येरंडगाव, बोधेगाव, चापडगाव.श्रीगोंदा-श्रीगोंदा, पेडगाव, मांडवगण, कोळगाव, बेलवंडी, देवदैठण, काष्टी, चिनाळा. पारनेर-पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, पळशी, वडझीरे, निघोज. नगर-जेऊर, कापूरवाडी, चिंचोडी पाटील, भिंगार, वाळकी, नालेगाव, सावेडी, नागापूर, चास, केडगाव. कर्जत- राशीन, कर्जत, भांबोरा, मिरजगाव, कोंभळी, माहिजळगाव. जामखेड- जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव.नगर जिल्हयातील 1323 गावांची निवड जिरायत ज्वारीसाठी करण्यात आली आहे.
ग
Post a Comment