उद्धव ठाकरेंचे सरकार विधानसभेत आज मांडणार विश्वासदर्शक ठराव



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव शनिवारी (दि. ३०) विधानसभेत मांडला जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. शनिवारी दुपारी सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असल्याने ठाकरे सरकारची ही पहिलीवहिली परीक्षा असणार आहे.

विधानसभेत शनिवारी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारबाबत विश्वासदर्शक ठराव शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मांडणार आहेत. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.

दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेवरून वळसे-पाटील यांना हे पद देण्याच्या प्रस्तावाला राज्यपालांनी शुक्रवारी मान्यता दिली आहे.

२८८ सदस्यांच्या सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी १४५ सदस्यांचा पाठिंबा हवा असतो. शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, अपक्ष ७ व घटक पक्ष १० असे १६८ संख्याबळ आघाडीकडे आहे. त्यामुळे सरकार हा विश्वासदर्शक ठराव सहज जिंकू शकते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post