खाऊच्या पैशातून करतेय झाडांची जपवणूक
माय अहमदनगर वेब टीम
राहुरी - रस्त्यावर लावलेल्या झाडांचे गुरांपासून संरक्षण व्हावे, यासाठी स्वतःला मिळणाऱ्या खाऊच्या पैशांतून आवश्यक साहित्य खरेदी करून राहुरी फॅक्टरी येथील सिद्धी तनपुरे झाडांची जपणूक करीत आहे. पाचवीत शिकणाऱ्या सिद्धीला झाडे लावल्यानंतर ती जगवण्याचा छंदच जडला असून पर्यावरण संवर्धनासाठी ती झटत आहे.
वृक्षारोपणाची मोहीम सुरू झाल्यानंतर अनेक जण वृक्षारोपण करण्यासाठी पुढे येतात. वृक्षारोपण करताना त्याचे फोटोसेशन करून ते सोशल मीडियावरदेखील टाकतात. पण त्यानंतर आपण स्वतः लावलेले झाड जगवण्यासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच असते. नगर जिल्ह्यातील राहुरी येथून आठ किलोमीटरवर असलेल्या राहुरी फॅक्टरी परिसरात डॉ. तनपुरे कामगार वसाहत येथे राहणारी सिद्धी तनपुरे ही शाळकरी विद्यार्थिनी मात्र झाडे लावून ते जगवण्याचा छंदच जपत आहे. त्यासाठी वेळप्रसंगी खाऊचे पैसे, स्वतःला भाऊबीजेला मिळालेले पैसेसुद्धा ती खर्च करताना दिसत आहे.
सिद्धी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. दोन वर्षांपूर्वी तिचे पित्याचे छत्र हरवले. मुंबईमध्ये राजश्री मनोहर या नातेवाईकांकडे सिद्धी गेल्या वर्षी सुट्टीमध्ये गेली होती. राजश्री मनोहर या दादरमधील एक वृक्षप्रेमी असून, परिसरातील वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन यासाठी त्या झटतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, राहुरी येथे पुन्हा आल्यानंतर सिद्धीने जोमाने झाडे लावण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षभरात तिने रस्त्याच्या कडेला, आवारात, अशा विविध ठिकाणी झाडे लावली. रोपांच्या जोमदार वाढीसाठी 'जीवामृत' कसे बनवतात, हे राजश्री मनोहर यांच्याकडून तिने शिकून घेतले होते. रस्त्यावर पडलेले शेण गोळा करून त्याचे खत करणे, जीवामृत करून लावलेल्या झाडांना टाकणे तिने सुरू केले. इतकेच नव्हे तर, रस्त्यावर लावलेल्या झाडांचे गुरांपासून रक्षण करण्यासाठी, स्वतःला मिळालेले खाऊचे, भाऊबीजेचे पैसे खर्च करून झाडांभोवती शेडनेट आणून तिने लावले आहे. सिद्धीच्या वडिलांच्या अकाली निधनानंतर तिची आई मीना तनपुरे या संसाराचा गाडा चालवण्यासाठी रोजंदारीवर काम करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानादेखील सिद्धी झाडांची जपणूक करीत पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत असून तिच्या या कामाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Post a Comment