पत्रकार चौकातील घटना वाहतूक शाखेच्या सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भरधाव वेगात येणार्या टँकरखाली चिरडून 32 वर्षीय मोटारसायकलस्वार कमलेश अनिल पटवा याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 30) दुपारी 12.30 वाजता नगर-मनमाड रोडवरील शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या समोर पत्रकार चौकात घडली. शहर वाहतूक शाखेच्या समोरच अवजड वाहतुकीने बळी घेतल्याने वाहतूक शाखेचे पितळ उघडे पडले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मार्केटयार्ड येथील अरिहंत सेल्स मशिनरी अॅण्ड हार्ड वेअर स्पेअर पार्टस् दुकानाचे कमलेश उर्फ अभिजीत अनिल पटवा (वय 32) हा त्याच्या दुचाकी मोपेड (एम एच 16, सीबी 9866) वरुन शहरातून सावेडीकडे जात असताना पत्रकार चौकात भरधाव टँकरखाली (एम एच 16 एई 5425) चिरडला गेला. त्यात कमलेश पटवा याच्या अंगावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघात होताच पत्रकार चौकात मोठी गर्दी झाली. अपघात इतका भयानक होता की ते दृश्य पाहताच अंगावर शहारे येत होते. दरम्यान शहर शाखेच्या पोलिसांनी व तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातामुळे पत्रकार चौकातील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये दुपारी उशिरापर्यंत अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेण्याचे काम चालू होते.
शहरात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना टँकर शहरातून कसा प्रवेश करु शकतो. त्याचबरोबर झालेला अपघात हा शहर वाहतुक नियंत्रण शाखेसमोरच झाल्याने चौकातील सिग्नल जवळील ट्रफिक पोलिस काय करीत होते. अशी चर्चा नागरीकांतून सुरु होती.
Post a Comment