दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश गारठले
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : देशातील उत्तर तसेच पूर्वेकडील प्रदेशांत थंडीची लाट आली आहे. राजस्थानच्या ५ शहरांत तापमान शून्याहून खाली घसरले. पंजाब, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत हुडहुडी भरली आहे. दिल्लीत शनिवारी सकाळी सरासरी १.७ अंश तापमानाची नोंद झाली. दिल्लीत हा दहा वर्षांतील सर्वात गारठवणारा डिसेंबर ठरल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. द्रासमध्ये पारा उणे २० अंशांवर नोंदवण्यात आला. डिसेंबरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ७ सिव्हियर कोल्ड डे व ८ कोल्ड डेची नोंद झाली आहे. राजस्थानच्या शेखावटीमध्ये पारा उणे ४ अंशांवर, तर सिकरमध्ये उणे १ अंशावर आला होता. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शनिवारी पारा ५.३ अंश नोंदवण्यात आला. सरासरीपेक्षा पाच अंशांनी तो कमी आहे. या ऋतूमध्ये भोपाळचे हे सर्वात किमान तापमान आहे. डोंगरात वसलेल्या पंचमढीमध्ये किमान तापमान १.२ अंश होते. दिल्लीत १९९७ नंतर पहिल्यांदाच सलग ११ व्या दिवशी भीषण थंडी पडली. १७ डिसेंबरचा अपवाद वगळल्यास दिवसाचे तापमान १६ अंशांपेक्षा जास्त झाले नाही. हिमाचलच्या केलाँगमध्ये उणे ११.५ होते. उत्तराखंडच्या केदारनाथ व बद्रिनाथमध्ये बर्फच बर्फ आहे. पिथोरगडमध्ये पारा ५ अंश होता. उत्तर प्रदेशच्या मथुरेत २ अंश, हरियाणाच्या हिसारमध्ये ०.२ अंश, पंजाबच्या बठिंडा २.३ अंश तापमान नोंदवले गेले.
Post a Comment