मुख्यमंत्री होता होता राहिले अन झाले विरोधी पक्षनेते


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. भाजपचे विधिमंडळ गटनेते असलेल्या फडणवीस यांचेच नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी आल्याने त्यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेते म्ह्णून करण्यात आली. विरोधी पक्षनेत्याची घोषणा आज होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. कारण, विधानसभेतील आजच्या कामकाचं स्वरुप पाहिल्यास अध्यक्षांनी तालिका नामनिर्देशित करणे, त्यानंतर अध्यक्षांची निवडणूक आणि राज्यपालांचं अभिभाषण असा क्रम देण्यात आला होता. त्यात विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत घोषणेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याची घोषणा आज होणार की नाही, हा प्रश्न होता. मात्र अध्यक्ष पटोले यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीची घोषणा केली. त्यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

निवडीची घोषणा करताना पटोले म्हणाले, 'विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाने गटनेते देवेंद्र फडणवीस हे 1 डिसेंबर 2019पासून विरोधी पक्ष नेते असतील असे मी जाहीर करतो'.

दरम्यान, फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या दिवसाची मला अपेक्षा नव्हती, मी इथं येईन अस कधीही म्हटलं नव्हत पण आलो. आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, 25 ते 30 वर्षे जे आमच्या विरोधात होते ते मित्र झालेत तर जे मित्र होते ते आज विरोधात बसलेत. मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post