'नुकसान भरपाई द्या, नाही तर आम्हाला मरू तरी द्या'


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - मायबाप सरकार ..... आमचं काही चुकत का? नाही तर आम्हाला मरु द्या....वाट पाहून पाहून आमची सहनशीलता आता संपुन गेली. तुम्ही काही दाद देत नाही मग आम्हाला तुमच्या दारातच मरु द्या, अशी आर्त हाक कामरगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे.

कामरगाव ता.नगर येथे एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या काळात अवकाळी व अति वृष्टीमुळे 101 शेतकऱ्यांच्या फुल शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयांकडे बाधित झालेल्या शेत मालाच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवले होते. त्याला तब्बल 2 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी त्याबाबत कृषी, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

गावातील आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ व तुकाराम कातोरे यांच्या नेतृत्वाखाली नगर पुणे महामार्गावर दोन महिन्यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी निवेदन स्वीकारून भरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले होते. तरीही अजुनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. त्याच बरोबर खासदार व आमदार यांनाही लेखी निवेदन दिले होते. आता मात्र शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून नुकसान भरपाई मिळण्याची आशा मावळत चालली आहे. कामरगाव सह तालुक्यातील सुमारे 300 शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.

येत्या पंधरा दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास तहसील कार्यालयापपुढे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, श्रीराम बॉईज चे अध्यक्ष शिवा सोनवणे, जेष्ठ नेते प्रकाश कातोरे, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ, बबनराव भुजबळ, हबीब शेख, भाऊसाहेब राजगुरू, पिंपळगाव कौड्याचे सरपंच सतीश ढवळे, भोरवाडी चे रेवजी जासूद, चैतन्य महापुरे, शुभम माळवे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी व प्रांत कार्यालयाला दिल्या आहेत.

नवीन सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही शेतकऱ्यांनी निवेदन पाठवले आहे.



नवीन सरकार कडून अपेक्षा
गेल्या दोन वर्षांपासून नुकसान भरपाई साठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहोत .परंतु लाल फितीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहे. नवीन सरकार कडून हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास वाटतो असे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी 'माय नगर'शी बोलतांना सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post