गुरूकुल शिक्षक मंडळाचे प्रतिभाविष्कार शिक्षक साहित्य संमेलनाला प्रतिसाद
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर ः ”कायदा हा वाईट नसून त्याचा उद्देश, हेतू समजून घेतल्यास त्याची महती लक्षात येते असे सांगून नागरीकत्व सुधारणा कायद्याचा अभ्यास न करता विरोध करणे ही शोकांतिका आहे”, असे प्रतिपादन राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले. अहमदनगर जिल्हा गुरूकुल शिक्षक मंडळ, प्राथमिक शिक्षक समिती गुरूकुल सांस्कृतिक समिती, गुरुकुल महिला आघाडी, ऊर्दू शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक समितीच्यावतीने आयोजित गुरूकुल प्रतिभाविष्कारातील शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आमदार लहू कानडे होते. भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव पाचपुचे, अभिनेता मोहिनीराज गटणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आम्ही कायद्याची भाषा बोलतो आणि साहित्यिक ही काळजाची! कायदा हा वाईट नसतो. तो नेहमीच चांगला असतो. त्याचा उद्देश, हेतू जेव्हा समजून येतो तेव्हा त्याची महती लक्षात येते असे सांगून नागरीकत्व सुधारणा कायदा किती जणांना माहिती आहे? असा प्रश्न सभागृहाला करून अॅड. उज्ज्वल निकम यांनी त्याकडे लक्ष वेधले. सभागृहातील एकानेच हात वर केला. त्यावर ते म्हणाले, ”ही शोकांतिका आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर त्यावर टिका केली पाहिजे. अभ्यास नसेल, तर त्यावर टिका करणे चुकीचे आहे की बरोबर याचा देखील अभ्यास केला पाहिजे. या कायद्याचा धर्माशी संबंध आहे का हे देखील अभ्यासले पाहिजे. चुकांची पुनरावृत्ती करणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणून त्यांनी समाजात, देशात जेव्हा ज्वलंत प्रश्नावर चर्चा होत असते तेव्हा शिक्षकांनी त्यावर अभ्यास करून पूर्णपणे बोलले पाहिजे”. सामाजिक शांतता, सलोख्याला जेव्हा धोका निर्माण होतो, त्यावेळी शिक्षकांची जबाबदारी समाजाप्रती वाढते, असेही ते म्हणाले. गुरूकुल मंडळाने आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांसाठी दिलेली 20 लाखांची मदत ही समाजासाठी आदर्श अशी गोष्ट आहे. तुम्ही नुसते शिक्षक नसून, समाज शिक्षक आहात, असेही कौतुक अॅड. निकम यांनी केले.
शिक्षक नेते तथा साहित्यिक डॉ. संजय कळमकर म्हणाले, ”शिक्षणाचे धोरणे आणि निर्णय समाजाभिमुख राहिले पाहिजे. ग्रामीण भाग त्यात केंद्रस्थानी असला पाहिजे. अशैक्षणिक कामांच्याविरोधातात शिक्षक कोर्टात जात आहेत. तेथूनच शैक्षणिक धोरणे ठरतात की काय, असे आता वाटायला लागले आहे. ही लढाई शिक्षकांच्या वाट्याला येणे कितपत योग्य आहे? याचा विचार आता व्हायला हवा. शिक्षकांना आता पगार नको, ते भरपूर आहे. त्यांना समाजात पत हवी आहे.” मोहिनीराज गटणे यांनी कलाकाराला कला ही समाजात समाज म्हणून जगायला शिकविते असे सांगून कलेमुळे कलाकाराला व्यासपीठ मिळते. पण ते टिकवायची कला देखील कलाकाराकडे असली पाहिजे. कलाकारांनी अहमदनगरची ग्रामीण अशी ओळख पुसण्यात पुढे असल्याचेही गटणे यांनी सांगितले.
उज्ज्वल निकम, वासुदेव सोळंके, मोहिनीराज गटणे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी यांनी प्रास्ताविक केले. अशैक्षणिक कामांबाबत, विशेष करून मतदार नोंदणीच्या कामाकडे औटी यांनी लक्ष वेधत आम्हाला याच्यातून वाचवा, असे साकडे त्यांनी अॅड. निकम यांना घातले. शिक्षक घेत असलेल्या उच्च शिक्षणाबाबत जिल्हा परिषदेला वावडे आहे. त्यावर नोटिस काढल्या जातात. कायदा सांगतो शिक्षण घ्या, आणि दुसरी जिल्हा परिषदेच शिक्षकांना शिक्षण घेण्यापासून रोखते, असे का? असा प्रश्न औटी यांनी उपस्थित केला. ”कला ही माणसाला नितीमान करते. यावरून नैतिकदृष्ट्याही आयुष्य जगले पाहिजे. प्रत्येकाने कला जोपाली पाहिजे”, असे अध्यक्षस्थानावरून भाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे यांनी केले.
प्राथमिक शिक्षक गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे यांनी स्वागत केले. उच्चाधिकारी समितीचे अध्यक्ष नितीन काकडे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग यांनी अनुमोदन दिले. उज्ज्वल निकम यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन रा. या. औटी, नितीन काकडे, संजय धामणे यांनी सत्कार केला. लहू कानडे यांचा सुदर्शन शिंदे, संतोष भोपे यांनी त्यांचा सत्कार केला. मोहिनीराज गटणे यांचा सत्कार गजानन जाधव, राजेंद्र ठागणे यांनी केला. वासुदेव सोळंके यांचा सत्कार इमान सय्यद, मधुकर मैड यांनी सत्कार केला. गुरूकुल महिला आघाडीतर्फे उज्ज्वल निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उज्ज्वल निकम यांचा जीवनपट एका चलचित्रातून यावेळी दाखविण्यात आला. संमेलनाच्या उद्घाटनाअगोदर शिक्षकांचा कलामहोत्सव कार्यक्रम झाला. अभिनेता मोहिनीराज गटणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वृषाली घोडके, नितीन भिंगारदिवे, राहुल पालवे, संतोष भांबरे, नितीन पवार, दीपक महाले, सुप्रिया घोडके, जयश्री पोतदार, स्नेहल लवांडे आदींनी यावेळी कलासादर केली.
संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, रघुनाथ लबडे, विजय काकडे, भास्कर नरसाळे, सीताराम सावंत, सुखदेव मोहिते, शिवाजी रायकर, वृषाली कडलग, सुनीता काटकर, शुभांगी ईश्वरे, राजेंद्र पटेकर, रज्जाक शेख, ज्ञानेश्वर नागरे, लक्ष्मण टिमकरे, बाळासाहेब अनपट, शंकर गुंजाळ, गजानन जाधव, सुनील नरसाळे, सुभाष बर्वे, इमाम सय्यद, अश्पाक शेख, उस्मान तांबोळी, जालिंदर खाकाळ, अशोक मुठे, विठ्ठल वराळे, सचिन वांढेकर, बापू लहामटे, विजय महामुनी, आजीनाथ पांढरे, सलीम शेख, दशरथ देशमुख, सुनील गाडेकर, बाळासाहेब खेडकर, मिलिंद पोटे, संतोष भोपे, स्वाती गोरे, मीना साबळे, राजलक्ष्मी शर्मा, ज्योती शिरोळे, जया कुलथे, नर्गीस शेख, वैशाली शिंदे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. भाऊसाहेब नगरे आणि सुनील जाजगे यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया इंगळे यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी आभार मानले.
शिक्षकांची वकिली करणार - अॅड. निकम
”शिक्षकांना खरच अशैक्षणिक कामांचा बोजा असले आणि त्याचा गुणवत्तेवर परिणाम होत असेल, तर त्याची कैफियत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारसमोर मांडले”, असे आश्वासन राज्य सरकारचे विशेष सरकारी वकिल अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिले. ते म्हणाले, मतदान नोंदणी हे काम खरच अशैक्षणिक असेल आणि त्याचा शैक्षणिक कामावर परिणाम होणार असेल, तर ती बाब गंभीर आहे. याबाबत मी मुख्यमंत्री यांच्यासमोर शिक्षकांची बाजू मांडले. परंतु त्यापूर्वी शिक्षकांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून आपण किती मनापासून काय-काय काम करतो, ही पडताळणी करावी. घरात, शेतात आपण काम करतोच ना. शिक्षक हा सर्वांना आवडतो. कारण तो दुसर्यांचे ऐकत असतो. सांगितलेले काम करतो. त्यामुळे मतदान नोंदणीचे काम तुम्हाला दिले जाते, असे अॅड. निकम म्हणताच सभागृहात हशा पिकला. अॅड. निकम म्हणाले, ”मुख्यमंत्री यांच्यासमोर कैफियत मांडताना, ती पूर्ण होईलच असे नाही. चर्चा करेल, त्याचा पाठपुरावा करेल. जसा मार्ग निघेल, तसा तो काढू. चर्चा करणे म्हणजे कामातून पूर्ण सुट नाही, असे म्हणताच सभागृहात पुन्हा हशा पिकला.”
Post a Comment