जागतिक तापमानात कमालीची वाढ!


माय अहमदनगर वेब टीम

माद्रिद : स्पेनमधील माद्रिद येथे २ ते १५ डिसेंबर या कालावधीत संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक हवामान परिषद सुरू आहे. या परिषदेमध्ये २०० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी यावेळी बोलताना हवामान बदलाविषयी सुरू असलेली लढाई कुणीही सोडू नका, असे कळकळीचे आवाहन केले. जागतिक तापमान वाढवणा-या हवामानातील वायूंचा स्तर अतिउच्च पातळीवर पोहोचला आहे. ३० लाख वर्षापूर्वी नव्हता इतका हा स्तर वाढला आहे. आजच्या तुलनेत त्यावेळी समुद्राचा स्तरही १० ते २० मीटर उंच होता, असे गुतारेस यांनी उद्घाटनीय भाषणामध्ये हवामानविषयीच्या भीषण आकडेवारीचा दाखला देत सांगितले.

कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत, तर याचा संपूर्ण जगाला मोठा धोका आहे. कोळसा जाळणे जोपर्यंत आपण बंद करणार नाही, तोपर्यंत हवामान बदलाविषयी सुरू असलेले सर्व प्रयत्न हे निर्थक ठरतील, असा इशारा त्यांनी दिला.

हवामान बदलांविषयी काम करण्यास आपण १० वर्षापूर्वीच सुरू केले असते, तर हे उत्सर्जन ३.३ टक्के या प्रमाणात कमी करणे ध्येय ठेवता आले असते. मात्र, आता वेळ गेली असून प्रत्येक राष्ट्राला हे प्रमाण आता ७.६ टक्के इतके कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यावर सर्व देशांचे सरकार, क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे असून हा एकमेव मार्ग आहे, असे गुतारेस म्हणाले.

सर्व देशांची कार्बनमुक्त अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काही मानके या परिषदेमधून ठरवून देण्याची गरज आहे. तापमान वाढीचा सामना करत असलेल्या आणि त्यासोबतच गरीब लोकांनाही या स्थितीची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे चिलीचे पर्यावरण मंत्री करोलिना सचमिड्ट यांनी सांगितले. त्यांनी जगभरातील सरकारांना आवाहन केले की, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांनी अधिक महत्त्वाकांक्षी कामे हाती घ्यावीत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post