अहमदनगरमध्ये बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व नगरमधील आंजनेय प्रतिष्ठानच्यावतीने दि.7 जानेवारी 2020 पासून वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही मागील वर्षीप्रमाणे 16 व 19 वर्षाखालील संघांची स्वतंत्र स्पर्धा होणार आहे. यात 16 व 19 वर्षाखालील मुलांच्या प्रत्येकी 12 संघांचा समावेश असेल. लेदर बॉलवर होणार्‍या या स्पर्धेतील सर्व सामने प्रत्येकी 20 षटकांचे होतील. 16 वर्षाखालील मुलांची स्पर्धा लीग कम नॉक आऊट पध्दतीने तर 19 वर्षाखालील मुलांची स्पर्धा नॉक आऊट खेळवली जाणार आहे. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सलग तिसऱ्या वर्षी हि स्पर्धा घेण्यात येत आहे. मंगळवार दि.7 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे उदघाटन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आ.अरूणकाका जगताप व आंजनेय प्रतिष्ठानचे संदीप पवार यांनी दिली.

स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना अरूण नाणेकर व डॉ.राहुल पवार यांनी सांगितले की, कै.बाळासाहेब पवार हे स्वत: उत्तम गोलंदाज व फलंदाज होते. क्रॉम्प्टन कंपनीत इंजिनीयर म्हणून काम करतानाच त्यांनी क्रिकेटची आवडही जोपासली होती. कूचबिहार, सी.के.नायडू या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या तसेच पश्चिम विभागीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. अहमदनगर जिल्हा संघाचे कर्णधारपदही त्यांनी भूषविले होते. नगरमध्ये दरवर्षी होणार्‍या क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातही सलग 23 वर्षे त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. क्रिकेटप्रती प्रचंड प्रेम असल्याने नवोदित खेळाडूंसाठी ते हक्काचे मार्गदर्शक होते. नगरमध्ये खेळाडू, पंच यांच्यासह स्कोअररसाठीही त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे घेतली. नगर जिल्ह्यातून दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, त्यांना विविध स्पर्धांतून आपले कौशल्य सादर करता यावे यासाठी त्यांनी सातत्याने काम केले.

वाडिया पार्क क्रिडा संकुलात या स्पर्धेत दररोज दोन सामने होणार आहेत. यात शाळा, महाविद्यालय, तालुका, क्लबच्या संघांना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेतील 16 व 19 वर्षाखालील विजेत्या व उपविजेत्या संघास रोख पारितोषिके व चषक देवून गौरविण्यात येईल. याशिवाय प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ दि मॅचचे पारितोषिक देण्यात येणार आहे. मॅन ऑफ दि सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज , उत्कृष्ट यष्टीरक्षक अशी पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा नगरकर क्रिकेटप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन कपिल पवार, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रा.माणिक विधाते व गणेश गोंडाळ यांनी केले आहे. हि स्पर्धा यशस्वीतेसाठी सुनील देवकर , शरद नरसाळे , अजय कविटकर , सुभाष भागवत , प्रशांत अन्तेपयेल्लू , गौतम शिंगी , सुभाष येवले , सोमनाथ नजान , भास्कर गायकवाड , विवेक लोखंडे आदी परिश्रम घेत आहेत.या स्पर्धेसाठी हॉटेल आवळा पॅलेस , क्रिश इंटरप्राइझेस , धनश्री फौंडेशन , परवेज सय्यद , शाम वाकचौरे ,विनोद सेल्स , एव्हरेस्ट कंपनी , शिंगी इलेक्ट्रिक वर्क्स , पुणे मेट्रो , साईटेक कॉर्पोरेशन यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post