जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लाच घेताना पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कौटुंबिक भांडणाबद्दलचे प्रकरण अदखपात्र गुन्ह्यावर मिटविण्यासाठी 15 हजार रूपयांची मागणी करून दहा हजार रूपयांची लाच स्विकारताना तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पोपट पंडित रोकडे (वय 49) यास लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांच्या नाशिक पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालयाजवळ शुक्रवारी (दि.27) दुपारी केली.
तक्रारदार याचे किरकोळ स्वरूपाचे कौटुंबिक भांडणाबद्दल प्रकरण अदखलपात्र गुन्ह्यावर मिटविण्यासाठी हे.कॉ. पोपट रोकडे यांनी तक्रारदार यांना 15 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. लाच मागणीच्या पडताळणीबाबत तडजोडीने दहा हजार रूपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाकडे तक्रार दिली. यावरून नाशिक पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष दंडाधिकारी यांचे कार्यालयाजवळ सापळा रचला. अन् हे.कॉ. रोकडे यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई नाशिक युनिटचे पो.नि. उज्ज्वलकुमार पाटील, पो. नि. प्रभाकर निकम, हे.कॉ. राजेंद्र डांगे, पो.ना. एकनाथ याविस्कर, पो.ना. राजेंद्र गिते, हे.कॉ. संतोष गांगुर्डे यांनी केली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक युनिटचे पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील हे करीत आहे.
Post a Comment