कांद्याला चढली 'लाली' ; नगरमध्ये विक्रमी भाव
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज गुरुवारी (५ डिसेंबर) झालेल्या कांद्याच्या लिलावात गावरान कांद्याला दिडशे तर लाल कांद्याला ९० रुपयांपासून ते १३० रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळाला. आजच्या बाजारभावाने नवा उच्चांक गाठला.
मागील काही महिन्यांपासून कांद्याची आवक कमी होत असून कांद्याचे दर रोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. देशभरात कांद्याची मागणी होत असल्यामुळे परराज्यातील व्यापारीही आता कांद्याची आवक जास्त असलेल्या कांदा बाजारात ठाण मांडूण आहेत. नगर बाजार समितीत रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरु झाल्यानंतर पहिल्याच लिलावात गावरान कांद्याला ८२ रुपये तर लाल कांद्याला ६२ रुपये दर मिळाला होता. सोमवारच्या लिलावात २० हजार गोण्या कांदा आवक झाली होती. आज गुरुवारी शेतकऱ्यांनी सुमारे ३० हजार गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यात चांगल्या दर्जाच्या लाल कांद्याला विक्रमी १५० रुपये किलोचा भाव मिळाला. गावरान तसेच काहीशा कमी प्रतीच्या लाल कांद्यालाही ९० रुपयांपासून ते १३० रुपये भाव मिळाला. या वर्षीचा हा उच्चांकी भाव आहे असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे, निरीक्षक जयसिंग भोर व संजय काळे यांनी सांगितले. नगर बाजार समितीत चांगल्या दर्जाचा व टिकाऊ कांदा विक्रीसाठी येत असल्याने देशभरातील आंध्र प्रदेश, बंगळूर, मुंबई, दिल्ली, ओरिसा देशभरात हा कांदा विक्रीला जातो. नगर बाजार समितीतील कांद्याचे दर हे विक्रमी असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले. सध्या नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अवकाश असल्याने कांद्याचे दर असेच चढे राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
Post a Comment