निंबोडीत कुस्त्यांचा थरार ; सुभाष गाढवेंनी पटकावली मानाची गदा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - हलगी व डफाचा निनाद, मातीत रंगलेला कुस्तीच्या डावपेचांचा थरार, आखाड्या भोवती जमलेले पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विजयी मल्लांवर होणारा बक्षिसांचा वर्षाव अशा उत्साहपुर्ण वातावरणात नगर तालुक्यातील निंबोडी येथे चंपाषष्ठी खंडोबा यात्रेनिमित्त निकाली कुस्तीचा हगामा उत्साहात पार पडला. महिला मल्लांना प्रोत्साह देण्यासाठी त्यांचे देखील विशेष कुस्त्या पार पडल्या. यामध्ये महिला कुस्तीपटूंनी आपल्या खेळाची कसब दाखवली. हगाम्यातील 86 किलोवरील अंतिम कुस्तीमध्ये सुभाष गाढवे याने चांदीची मानाची गदा व रोख 25 हजार रुपये बक्षिस पटकाविले.
प्रारंभी ग्रामस्थांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करुन कुस्ती हगाम्याचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी यात्रा कमिटीचे संतोष बेरड, जगन्नाथ लांडगे, भाऊसाहेब धावडे, प्रकाश पोटे, दत्तात्रय बेरड, बाबासाहेब बेरड, रशीद शेख, दिलीप आवारे, भिमा बेरड, अशोक जाधव, महेश जाधव, सरपंच शंकर बेरड, उपसरपंच काकासाहेब बेरड आदींसह मल्ल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी चंद्रकांत महाराज खळे यांचे किर्तन होऊन दुपारी निंबोडी जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील आखाड्यात कुस्ती हगामा सुरु झाला. यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील दोनशे पेक्षा जास्त मल्ल सहभागी झाले होते. गावात खंडोबा यात्रेनिमित्त रंगणार्या तमाशा फडावर कायमची बंदी टाकून कुस्ती फडाला प्रोत्साहन देण्यासाठी जंगी कुस्ती हगामा घेण्याचा निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत करुन हा जंगी कुस्ती हगामा यशस्वी केला. मल्लांच्या रंगलेल्या कुस्तीत एकापेक्षा एक सरस डावांनी उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कुस्ती हगाम्यात महिला कुस्तीपटूंनी देखील आपली कसब दाखवून उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन केले. रात्री 8 वाजे पर्यंन्त हा कुस्ती हगामा रंगला होता. सर्व कुस्त्या वजनगटाप्रमाणे लावण्यात आल्या. मुलींमध्ये शेवटची कुस्ती 76 किलोवरील प्रितम दाभाडे विरुध्द वैष्णवी पालवे यांच्यात झाली. यामध्ये वैष्णवी पालवे हिने दाभाडेला चितपट करीत कुस्ती जिंकली. तिला 11 हजार रुपयाचे रोख बक्षिस देण्यात आले. शेवटची मानाची 86 किलोवरील अंतिम कुस्ती मयुर जपे विरुध्द सुभाष गाढवे यांच्यात रंगली. कुस्ती चितपट होत नसल्याने 3 मिनटासाठी कुस्ती गुणांवर घेण्यात आली. यामध्ये सुभाष गाढवे याने 2 गुणांची कमाई करुन अंतिम कुस्ती जिंकत चांदीच्या गदेचा मान मिळवला. या कुस्ती हगाम्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी सचिन येलभर, अनिल गुंजाळ, उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले, अॅड.पै.समीर पटेल, मनोज शिंदे, अजय अजबे या नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. कुस्तीचे पंच व समालोचक म्हणून पै.भाऊसाहेब धावडे व पै.प्रकाश पोटे यांनी काम पाहिले. सर्व वजनगटातील विजयी मल्लास बक्षिसाची 80 टक्के तर उपविजयी मल्लास 20 टक्के रक्कम देण्यात आली.
खंडोबा यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या पहिला दिवशी गावातील युवकांनी जेजुरी येथून आनलेल्या ज्योतची गावात मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली होती. संध्याकाळी छबीना मिरवणुकी दरम्यान करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. यात्रेनिमित्त गावातील खंडोबा मंदिराला रंगरंगोटी करुन, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जागृक देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मंदिरात जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
Post a Comment