झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध ?


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवड होणार आहे. महाविकास आघाडीने दोन्ही पदे बिनविरोध काढण्यासाठी पावले टाकली आहेत. आघाडीला आव्हान देणारी भाजपा आकड्यांच्या खेळात अडकली आहे. दुसरीकडे भाजपाची ज्या काँग्रेस सदस्यांवर भिस्त आहे, त्या सदस्यांच्या डोक्यावर व्हिपमुळे निर्माण होणार्‍या तांत्रिक संकटाची तलवार आहे. भाजपाने सत्तेसाठी दावा ठोकण्याचा निर्णय घेतला असला तरी ऐन निवडीच्यावेळी संख्याबळ जुळविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या स्थितीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आणि गडाख गटाच्या महाविकासआघाडी सत्तेचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.



जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांची मंगळवारी निवड होणार आहे. यासाठी महसूलच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आणि गडाख यांच्या महाविकासआघाडीने कंबर कसली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात 72 सदस्यांच्या संख्याबळात भाजप एकाकी पडल्याचे दिसत आहे. तोडक्या सदस्यांच्या बळावर भाजपा काय डाव टाकणार, याची उत्सुकता आहे. एका सदस्यांने राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने निवडीआधीच भाजपाला धक्का बसला आहे. जागा रिक्त झाल्याने भाजपचे जिल्हा परिषदेतील संख्याबळ 12 वर सदस्यांपर्यंतच आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 23 सदस्य असून यात आ. बाळासाहेब थोरात गटाचे 10 तर उर्वरित 13 सदस्य आ. राधाकृष्ण विखे गटाचे होते. मात्र, काही दिवसांपूर्वी काँग्रेसने गट नेता बदलला असून विखे गटाचे 2 सदस्य आणि विद्यमान सभापती अनुराधा नागवडे यांनी थोरात गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विखे गटाचे संख्याबळ कमी झाले असून ऐनवेळी काँग्रेसच्या गट नेत्यांनी काढलेल्या व्हिपमुळे विखे गटाची तांत्रिक अडचण होण्याची शक्यता अधिक आहे.

या तांत्रिक अडचणीत सापडून सदस्यपदही धोक्यात येईल, याची जाणीव अनेक सदस्यांना आहे. भाजपाची सर्व भिस्त विखेंवर आहे. मात्र राज्यातील नव्या राजकीय समिकरणात महाविकास आघाडी सध्यातरी मजबूत दिसत आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषद निवडींमध्येही एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या एकसंघ आघाडीला आव्हान मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post