हिवाळ्यात गरोदर महिलांचा आहार कसा असावा!
माय अहमदनगर वेब टीम
हिवाळ्याच्या दिवसात गरोदर महिलांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक असतं. गर्भातील बाळाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गरोदर महिलेने योग्य आणि पोषक आहार घेणं गरजेचं आहे. हिवाळ्यात गरोदर महिलांनी नेमका कसा आहार घ्यावा याची माहिती आज पाहुयात...
हिवाळ्याच्या दिवसात गरोदर महिलांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक असतं. गर्भातील बाळाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गरोदर महिलेने योग्य आणि पोषक आहार घेणं गरजेचं आहे. गरोदर महिलांना प्रोटीन, उर्जा, आयर्न, आयोडीन, कॅल्शियम हे पोषक घटक आहारातून मिळणं आवश्यक असतं. यासाठी गरोदर महिलांना धान्य, कडधान्य, फळं, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ असा समतोल आहार दिला गेला पाहिजे.
आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करावा. गरोदरपणात तुम्ही किती कॅलरी घ्याव्यात हे तुमची शारीरिक हालचाल आणि वजन यावर अवलंबून असतं. गरोदरपणातील पहिल्या त्रिमाहित महिलांनी अतिरिक्त कॅलरीज घेऊ नये. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रिमाहित महिलांनी 300 हून अधिक कॅलरी दिवसाला घेणं आवश्यक आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी अन्टीऑक्सिडंट असलेले फळं आणि भाज्या खाव्या. ज्या फळांमध्ये व्हिटॅमीन सीचं प्रमाण असतं जसं की, संत्र, मोसंबी, मेलन, आवळा आणि केळी खावीत. हिरव्या, लाल रंगांच्या भाज्या खाव्या. ब्रोकोली, पालक, शेपू तसचं गाजर, बीट, लाल शिमला मिर्ची यांचा आहारात समावेश करावा.
थायरॉईड हार्मोन तयार होण्यासाठी आयोडीन फार गरजेचं असतं. जर आयोडीनचा अभाव असेल तर नवजात बालकाची मानसिक वाढ योग्य पद्धतीने न होण्याची दाट शक्यता असते. आयोडीनची कमतरता भासू नये यासाठी मासे, अंड खावं.
डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्या. याशिवाय ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, मिल्कशेक, सूप किंवा डाळीचं पाणी देखील पिऊ शकता.
कॅल्शियम आणि प्रोटीन मिळण्यासाठी दिवसातून 3-4 वेळा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खावेत.
गरोदर महिलांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे ज्या फळांमध्ये जास्त फायबर आहे ती फळं खावीत.
हिवाळ्यात हे पदार्थ खाणं टाळावं : ज्या पदार्थांमध्ये अतिरिक्त फॅट, मीठ आणि साखरेचं प्रमाण आहे ते पदार्थ खाणं टाळावं. मद्यपान करू नये. मद्यपानामुळे गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. कॅफेनचं अतिप्रमाणात सेवन करू नये. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्रक्रिया केले बाहेरचे पदार्थ खाऊ नये. गरोदरपणात असे पदार्थ न खाल्ल्यास वजन वाढणं, मधुमेह (गरोदरपणात होणारा) किंवा इतर अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
Post a Comment