येत्या एक-दोन दिवसांत खातेवाटप : मुख्यमंत्री


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : येत्या एक ते दोन दिवसांत मंत्रिमंडळाचे खातेवाटप होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केले. शिवसेनेत नाराजी आहे का? सुनील राऊत यांच्यासह इतर नेते नाराज आहेत का? असे विचारता मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही. कुणाचीही नाराजी आमच्यापर्यंत आलेली नाही.

शेतकरी पीक कर्जावरुन काहीजण वाद उकरून महाविकास आघाडीच्या बदनामीच्या प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. दीड लाखांची मर्यादा आम्ही दोन लाख केली आहे. ज्या अटी, शर्थी आधीच्या सरकारने घातल्या होत्या त्या आम्ही काढून टाकल्या आहेत असेही ते म्हणाले. आम्ही भिंती रंगवण्याचे प्रकार करत नाही, आम्ही जे काही करतो ते रोखठोक करतो. भाजपच्या लोकांना आम्ही मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी बोलावले होते ते आले नाहीत. तो त्यांचा प्रश्न आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

राज्यपालांविरोधात तुमचा संघर्ष सुरु आहे का? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. राज्यपालांसोबत आमचा कोणताही वाद नाही, संघर्ष नाही. के. सी. पाडवी हे उत्साहाच्या भरात बोलले. मात्र शपथ घेताना काही संकेत पाळायचे असतात, ते त्यांनी पाळले नाहीत म्हणून राज्यपालांनी त्यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली.

यामध्ये संघर्षाचा काही प्रश्नच येत नाही. राज्यपालांनी पुन्हा शपथ घ्यायला लावली कारण उद्या काही लोक त्यावर आक्षेप घेऊ शकतात. आपल्या राज्यात कसे लोक आहेत हे तुम्हाला ठाऊक आहेच, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post