माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेते फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतांना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आ. पवार यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी एक घोषणा केली होती की, इथून पुढे राज्यात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. दादांनी ही घोषणा करून आता एक वर्ष होत आलं, रस्त्यावरचे खड्डे तर बुजले नाहीतच पण या सरकारने राज्याच्या तिजोरीला मात्र मोठा खड्डा पाडला आहे.
आज राज्यावर जवळपास ६ लाख ७१ हजार कोटी रुपयांच कर्ज आहे. सरासरी हिशोब केला तर राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ५४ हजार रुपयांचा बोजा पडला आहे. मला मान्य आहे की राज्याचा कारभार चालवताना कर्ज काढण्याची गरज भासू शकते. आघाडी सरकारच्या काळात देखील कर्ज काढलं गेलं होतं पण त्याकाळात काढलेल्या कर्जातून होणारी कामे आपणा सर्वांना दिसत होती. आज समस्या हीच आहे की गेल्या पाच वर्षात कर्जे तर भरमसाठ काढली गेली. परंतु त्यामुळे ना शेतकरी कर्जमुक्त झाला, ना युवकांना रोजगार मिळाला, अहो रस्त्यावरचे साधे खड्डे देखील बुजले नाहीत मग ही रक्कम नेमकी गेली कुठे ?
पण आता जनतेच्या हक्काचं आपलं महाआघाडीच सरकार सत्तेत आहे, राज्याची आर्थिक अवस्था पूर्वीसारखी मजबूत करून राज्याच्या विकासाला गती कशी देता येईल यावर आमचं काम सुरू देखील झालं आहे. या महाविकास आघाडीचा एक सदस्य म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की आपलं हे सरकार महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशात अग्रेसर बनवणार. माझी फक्त विरोधी पक्षाला एकच विनंती आहे की, तुमच्या काळात झालेल्या धोरणात्मक चुका सुधारून राज्याला पुन्हा एकदा योग्य दिशेने घेऊन जाण्याचं काम सुरू झालं आहे. आपण देखील विरोधी पक्षाची भूमिका योग्यप्रकारे निभावत आम्हाला सहकार्य करावं.
Post a Comment