माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतमालाला योग्य भाव, भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के आरक्षण, दहा रुपयांत थाळी, बेरोजगारांना भत्ता, अंगणवाडी सेविकांना अधिकच्या सुविधा आणि प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी याला ठाकरे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे,' तशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी रविवारी केलेल्या अभिभाषणात दिली.
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपालांचे रविवारी सायंकाळी चार वाजता अभिभाषण झाले. त्याला दोन्ही सभागृहांतील सदस्य उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, 'दहा रुपये इतक्या वाजवी दरात जेवणाची थाळी पुरवण्यासाठी अामचे शासन प्रभावी उपाययोजना करणार करणार आहे.'
'प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंवर राज्यात असलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी करेल. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या संबंधात दावा केलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्याला सरकारचे प्राधान्य राहिली. सुशिक्षित बेरोजगार युवकांना अधिछात्रवृत्ती देण्यात येईल. अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांच्या सेवासुविधांमध्ये सुधारणा करण्यात येईल. तसेच राज्यात आठ लाख स्वयंसहायता बचत गटांच्या बळकीकरणासाठी शासन प्रयत्न करणार आहे.'
शेतमालास योग्य हमीभाव मिळण्यासाठी हे सरकार उपाययोजना करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
तसेच ग्रामीण पत क्षेत्राची दुरवस्था दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असून मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी शाश्वत पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याच्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे राज्यपालांनी स्पष्ट केले. युवकांना बेरोजगार अधिछात्रवृत्ती देण्यात येईल, तालुका स्तरावर एक रुपया क्लिनिक योजना चालू केली जाईल. आरोग्य विमा योजनांचे एकत्रीकरण केले जाईल. सर्व पोलिस ठाणी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलशी जोडण्यात येतील आणि गडकिल्ल्यांचे संरक्षण केले जाईल, अशी हमी राज्यपालांनी अभिभाषणात दिली.
Post a Comment