अहमदनगर - लहानपणापासून तुम्हाला ज्या सवयी लागतात, त्या जीवनभर तुमची साथ करतात. त्यासाठीच बालसंस्काराला महत्त्व देणे गरजेचे आहे. आजकाल खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये खूपच बदल झाल्याचे दिसून येते. जंक फुड व चमचमीत पदार्थ खाण्याकडे कल आहे. त्यामुळे लठ्ठ होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यापासून मुलांना परावृत्त करून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीनेच सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना झुंबा नृत्याचे धडे देण्यात आल्याचे प्रतिपादन साक्षी कपूर यांनी केले.
सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना झुंबा नृत्यविषयक मार्गदर्शन करून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शक साक्षी कपूर बोलत होत्या. यावेळी प्राचार्या गीता तांबे, उपप्राचार्या कांचन पापडेजा आदींसह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनीही झुंबा नृत्याच्या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
उपप्राचार्या कांचन पापडेजा म्हणाल्या की, सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. त्या दृष्टीने वर्षभर स्कूलमधील विविध वयोगटातील मुला-मुलींसाठी आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी करून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सर्व शिक्षक व शिक्षिका करीत असतात, असे त्या म्हणाल्या.
यावेळी प्राचार्या गीता तांबे यांनी साक्षी कपूर यांची ओळख करून देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा रंगलानी यांनी केले, तर आभार प्रीती कटारिया यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुंजन पंजवानी, दीपा आहुजा, कणन आदींनी प्रयत्न केले.
Post a Comment