पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात, मामा-भाचे, मामासासरे-भाचेजावईही
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात घराणेशाहीचा वरचष्मा पाहायला मिळाला. तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, या सत्तेत सामान्य आमदारांना मंत्रिपद देण्याऐवजी सत्तेतील सोयरे सकळ, खूश राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सोयर्यांचा गोतावळा पाहायला मिळत आहे.
‘सत्तेतील सोयरे सकळ’, या उक्तीची सार्थ प्रचिती मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाहायला मिळाली आहे. पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात असल्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित पहिल्यांदा पाहायला मिळाले आहे. ठाकरे पितापुत्राने एकत्रितपणे संसदीय राजकारणात पदार्पण केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राहुरीचे प्राजक्त तनपुरे भाचे आहेत.
मंत्रिपदाच्या यादीत अकोलेचे आमदार लहामटे यांचे नाव होते. पण जयंत पाटलांनी आपल्या भाच्यासाठी आग्रह धरल्याने पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर विधानसभेत पाऊल ठेवणार्या माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपदाची संधी मिंळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचेजावई असलेले शंकरराव गडाख यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
आदित्य ठाकरे यांची शिवसेनेने थेट कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लावली आहे. मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे ही ठाकरेशाही सत्तेत चांगलीच रमली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घराणेशाहीवर नेहमीच टीका केली. मात्र, प्रिन्स सूटमधल्या आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतल्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केल्याचे शपथविधी सोहळ्यात दिसून आले.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूर मतदारसंघातून सलग तिसर्यांदा निवडून आले. आणि तिसर्यावेळी थेट कॅबिनेटमंत्रिपदापर्यंत अमित देशमुख पोहोचले.
दोन वेळा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र होय. बालपणापासून सत्तेचे खेळ आणि कायम सत्तेच्या विविध पदांवर असणारे अशोक चव्हाण सकळ सत्तेचे कायमचेच सोयरे आहेत, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.
गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि पंकजा मुंडेंचे चुलत बंधू असलेले धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत तयार झाले. भाजयुमोमध्ये मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आता कॅबिनेट मंत्रिपदावर त्यांनी झेप घेतली.
जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत बडे नेते अंकुशराव टोपे यांचे पुत्र राजेश टोपे आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. अंकुशराव टोपे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले होते.
काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत कदम यांनी राज्य काँग्रेसमध्ये अनेक जबाबदार्या सांभाळल्या आहेत. भारती विद्यापीठाचे सचिव असलेले विश्वजीत कदम राज्यातल्या बड्या राजकीय कुटुंबातून येतात.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लागली आहे. धारावी मतदारसंघातून सातत्याने निवडून येणार्या वर्षा गायकवाडांना काँग्रेसने संधी दिली आहे. मात्र, मुंबईतून प्रतिनिधीत्व देताना काँग्रेसने घराणेशाहीच कायम ठेवली.
खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे पहिल्यांदाच निवडून येऊन थेट राज्यमंत्री बनल्या आहेत. रायगड जिल्ह्यातले बडे प्रस्थ असलेल्या तटकरे कुटुंबानंही घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
अजितदादा चौथ्यांदा उपमुख्यमंत्री अनोखा विक्रम नावावर
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यासोबत अजित पवारांच्या नावे तीन वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा अनोखा विक्रमही रचला गेला आहे.
आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला आहे. अवघ्या सव्वा महिन्यांच्या कालावधीत अजित पवारांनी दुसर्यांदा शपथ घेतली. विशेष म्हणजे दोन्ही वेळा अजित पवारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली.
Post a Comment