खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे सुपूत्र आहेत. ते सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला होता. 2014 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून देखील काम पाहिले होते.
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे असलेले विकास खारगे यांचा जन्म 17 मार्च 1968 चा असून त्यांचे शालेय शिक्षण इचलकरंजीच्या शाहू नगरपरिषदेच्या शाळेत तसेच व्यंकटराव माध्यमिक शाळेत तसेच कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकीमधून त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) ही पदवी संपादन केली. तसेच युकेच्या युनर्व्हिसिटी ऑफ ससेक्समधून एम.ए. (गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट) पूर्ण केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथे सहायक जिल्हाधिकारी, नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच यवतमाळ आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामगिरी केली. मुंबई येथे विक्रीकर सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेचे संचालक, कुटुंब कल्याण आयुक्त, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे संचालक, राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, बृहन्मुंबईचे अतिरिक्त आयुक्त तसेच वन विभागाचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर ते होते.
Post a Comment