युथ वनडे क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलग दुसरा विजय


माय अहमदनगर वेब टीम
ईस्ट लंडन : दुसरी लढत ८ विकेट आणि ३३.४ षटके राखून जिंकताना भारताने १९ वर्षाखालील युथ वनडे क्रिकेट स्पर्धेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. यशस्वी जैस्वालची अष्टपैलू खेळी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.

शनिवारी झालेल्या सामन्यात पाहुण्यांनी यजमानांचे १२० धावांचे आव्हान १६.२ षटकांत २ विकेटच्या बदल्यात पार केले. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर आणि कर्णधार प्रियम गर्गला खातेही उघडता आले नाही. तिस-या क्रमांकावरील शशावत रावतही (२) झटपट माघारी परतल्याने पाहुण्यांची अवस्था २ बाद २६ धावा अशी झाली. मात्र दुसरा सलामीवीर ‘मुंबईकर’ यशस्वी जैस्वालने ८९ धावांची नाबाद खेळी करतानाच ध्रुव जुरेलसह (नाबाद २६) तिस-या विकेटसाठी १०.१ षटकांत ९४ धावांची झटपट भागीदारी करताना भारताला मोठया फरकाने विजय मिळवून दिला. यशस्वीच्या ५६ चेंडूंतील चमकदार खेळीमध्ये १४ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.

यशस्वी जैस्वालची फटकेबाजी महत्त्वपूर्ण ठरली तरी दक्षिण आफ्रिकेला २९.५ षटकांमध्ये ११९ धावांमध्ये रोखताना भारताच्या गोलंदाजांनी पूर्वार्धात विजय नक्की केला. फलंदाजीपूर्वी यशस्वीने गोलंदाजीतही प्रभाव पाडला. ‘कामचलावू’ डावखुरा गोलंदाज जैस्वालने १३ धावांमध्ये ४ विकेट घेत प्रतिस्पध्र्याच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. यजमानांच्या पाच फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या तरी त्यात सर्वाधिक २५ धावा तिस-या क्रमांकावरील जोनाथन बर्डच्या आहेत. आकाश सिंग, अथर्व अंकोलेकर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन विकेट घेत यशस्वीला चांगली साथ दिली.

सलग दुस-या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या युथ वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post