अहमदनगर - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपच्या सोमवारी नगरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, अध्यक्षपदाचा उमदेवार कोण याचे गूढ कायम आहे.
सोमवारी सायंकाळी माजी मंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या पदाधिकारी, आमदार आणि माजी आमदारांची बैठक झाली. यावेळी आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते, माजी आ. शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड आणि जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रतोद जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली. सत्तेसाठी आवश्यक असणारे सदस्य जुळविण्यासोबत ऐनवेळी कोणाची मदत घ्यावयाची यावर चर्चा झाली.
बैठकीत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. यासाठी सोमवारी रात्री काही बोलणी करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांनी सांगितले. मात्र, अध्यक्ष उपाध्यक्षपदाचा उमेदवार हे जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीतील चुरस वाढणार आहे.
Post a Comment