ओवेसींचा तोल सुटला; नागरिकत्व विधेयक फाडले!
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संसदेत वादळी चर्चा सुरू असून एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आक्रमक होत लोकसभेत या विधेयकाची प्रत फाडून आपला निषेध नोंदवला. या प्रकाराची गंभीर दखल घेत सभापतींच्या आसनात विराजमान असलेल्या रमा देवी यांनी कारवाई करत ओवेसी यांनी केलेली कृती कामकाजातून वगळण्यात यावी, असे आदेश दिले.
असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा लोकसभेत कडाडून विरोध केला. आम्ही जीनांचं म्हणणं नाकारलं आणि मौलाना आझाद यांनी सांगितलेल्या मार्गाने चाललो. आमचं भारताशी १ हजार वर्षांपासूनचं नातं आहे, असं मौलाना आझाद सांगायचे, असे नमूद करत आताच्या सरकारला नेमकी मुस्लिमांबाबत कोणती समस्या आहे?, असा सवाल ओवेसी यांनी केला. मी या विधेयकाच्या विरोधात उभा आहे, असे नमूद करतानाच मुस्लिमांना 'स्टेटलेस' बनवण्याचा प्रयत्न सुरू असून या विधेयकाबरोबरच देश आणखी एका फाळणीकडे चालला आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. ओवेसी यांनी सरकारवर बेछूट आरोप करतानाच हातातील विधेयकाची प्रत फाडल्याने संपूर्ण सभागृह अवाक झालं. ओवेसी यांची ही कृती कामकाजातून वगळण्यात आली आहे.
Post a Comment