महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार अखेर जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर  – महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार अखेर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. शासनाने तसे पत्र शनिवारी महापालिकेला दिले. दरम्यान, महापालिकेतर्फे भालसिंग यांना शनिवारी सायंकाळी निरोप देण्यात आला.

महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग शनिवारी दि. 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांचा कार्यभार कोणाकडे सोपविण्यात येणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. राहुल द्विवेदी यांच्याकडे आतापर्यंत तीनवेळा महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार आलेले आहे. भालसिंग निवृत्त झाल्यानंतर लगेच पुर्णवेळ आयुक्त मिळेल, असेही सांगितले जात होते. मात्र राज्यात सत्ता स्थापनेचा खेळ सुरू झाल्याने बदल्या करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला.

मध्यंतरी एका शिष्टमंडळाने नगरविकास खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन पुर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना पुर्णवेळ आयुक्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

असे असले तरी नगरला येण्यासाठी अधिकारी उत्सूक नाहीत. अनेकांच्या नावांची चर्चा असतानाही त्यापैकी कोणाचीच बदली येथे अद्याप झालेली नाही. शनिवारी सायंकाळी नगरविकास खात्याकडून महापालिकेला आलेल्या पत्रात आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे सोमवारपासून महापालिकेत पुन्हा एकदा ‘द्विवेदी राज’ सुरू होणार आहे. दरम्यान, आयुक्त भालसिंग यांना आज महापालिकेतर्फे सायंकाळी उशीरा निरोप देण्यात आला. या कार्यक्रमासाठी महापौर बाबासाहेब वाकळे, इतर पदाधिकारी, नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post