कुख्यात गुंड अरुण गवळीची जन्मठेप कायम


माय अहमनगर वेब टीम

मुंबई - गँग्स्टर अरुण गवळीला जन्मठेप प्रकरणी दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हायकोर्टाने सोमवारी दिलेल्या निकालात अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा काय राहणार असे स्पष्ट केले आहे. 2008 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात गवळीसह त्याच्या साथिदारांना शिक्षा झाली होती. 2012 मध्ये विशेष मकोका न्यायालयाने त्या सर्वांना आजीवन कारावास सुनावला होता. जस्टिस बीसी धर्माधिकारी आणि स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.


अरुण गवळी आणि त्याच्या साथिदारांनी 2008 मध्ये सुपारी घेऊन हत्या केली होती. यामध्ये अरुण गवळी गँगला साहेबराव भिंताडे आणि बाळा सुर्वे या दोघांनी 30 लाख रुपये दिले होते. यानंतरच नियोजित कट रचून आरोपींनी शिवसेना नगरसेवकाचा घाटकोपर येथे खून केला होता. जमीन खरेदी आणि राजकीय वादातून हत्येची सुपारी देण्यात आली होती असे आरोपपत्रात नमूद आहे. 2008 मध्ये झालेल्या या प्रकरणाचा तपास करून प्रकरण मकोका न्यायालयात पाठवण्यात आले. याच विशेष न्यालयाने सर्वांना दोषी मानत शिक्षा सुनावली होती. शिक्षेनंतर अरुण गवळीला नागपूरच्या कारगृहात ठेवण्यात आले होते. या दरम्यान 2015 मध्ये त्याला मुलीच्या लग्नासाठी पॅरोल सुद्धा मिळाला होता. या शिक्षेच्या विरोधात गवळीच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, गवळीला दिलासा देण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post