' त्यांना ' तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात
माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जे पक्षाला सोडून गेले त्या ठिकाणी नवीन दमदार कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यांना पक्षात घेण्याची घाई नाही. या नवीन कार्यकर्त्यांना विचारूनच गयारामांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना पक्षात परतण्याची दारे तूर्तास तरी बंद असल्याचे संकेत दिले आहेत.
पक्षसोडून गेलेले नेते आता अत्यंत अस्वस्थ आहे. वारे फिरेल तसे फिरणारे हे नेते संधीसाधू असून पक्षाला फसविणारे असल्याचा टोला राधाकृष्ण विखेचे नाव न घेता पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना थोरात यांनी लगावला आहे. दरम्यान महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही वाद नसून नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी श्री. थोरात यांनी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी भाजपमधील अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कातअसल्याच्या वृत्ताला दुजोरा देत, सत्ता न आल्याने भाजपतंर्गत खदखद सुरू झाली असल्याचे म्हटले आहे. एकनाथ खडसे पक्षाचे जुने नेते आहेत, पक्ष वाढवण्यिात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र तेच अस्वस्थ आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस सोडून भाजपात गेलेल्यांनाही आता पश्चाताप होत आहे. मात्र, भाजपात गेलेल्या कॉंग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांना पक्षात लवकर प्रवेश दिला जाणार नाही. काँग्रेस सोडून गेले आहात तर त्यांना थोडे दिवस तिकडेच राहू द्या असा टोला परतणाऱ्यांना त्यांनी लगावला आहे. पक्षाला सोडून गेल्यानंतर त्या जागी निष्ठावान कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय गरायारामाना प्रवेश नाही अशी स्पष्ट भूमिका थोरात यांनी घेतली आहे. अवकाळी, अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांबाबत लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, हे सर्वांना वाटत असले तरी एन्काऊंटर कोणत्या परिस्थितीत झाले याबद्दल मात्र त्यांनी बोलणे टाळले.
Post a Comment