' त्या ' आईस्क्रीम उत्पादकावर कारवाई



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर  –  बीडच्या अन्न व औषधे सहायक उपायुक्त कार्यालय (एफडीए) प्रशासनाने नगर एमआयडीसीतील आईस्क्रीम उत्पादक कंपनीवर कारवाई केली आहे. आईस्क्रीममधील घटकांची कमतरता असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे.

नगर एमआयडीसीमध्ये ब्लॉक नंबर डी-12 मध्ये हॅटसन अ‍ॅग्रो प्रा. लि. कंपनीकडून आईस्क्रीमचे उत्पादन घेतले जात आहे. ‘अरुण आईस्क्रीम’ नावाने उत्पादन बाजारात आहे. बीड जिल्ह्यात आईस्क्रीमची विक्री करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील मे. श्रीनाथजी एंटरप्रायजेस येथे अन्न-औषधे प्रशासनाचे निरीक्षक ए. बी. भिसे यांनी 4 एप्रिल 2019 रोजी आईस्क्रीमचे नमुने तपासले. अन्न, सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील तरतुदीनुसार या आईस्क्रीममध्ये निर्धारित घटकांचे प्रमाण कमी आढळले. अन्न पदार्थ प्रादेशिक लोक आरोग्य प्रयोगशाळा, औरंगाबाद आणि रेफरल फूड लॅबोरेटरी, पुणे यांनी आईस्क्रीम कमी दर्जाचे असल्याचे घोषित केले आहे.

बीड कार्यालयाने दि.25 सप्टेंबर 2019 रोजी नगरच्या अन्न-औषधे प्रशासनाला अरुण आईस्क्रीमची तपासणी करून आईस्क्रीम उत्पादक कंपनीचे नाव, पत्ता, संचालक, भागिदारांची माहिती, अन्न-औषधे प्रशासनाचे सर्व परवाने आहेत का? यापूर्वी या कंपनीवर काही कायदेशीर कारवाई झाली आहे का, या बाबींची माहिती मागविली आहे. नगरच्या अन्न-औषधे सहाय्यक उपायुक्त कार्यालयाने तपासणी केली. आईस्क्रीमचा साठा करण्यासाठीचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा परवाना घेईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी साठवणुकीचा परवाना मिळण्यासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त संजय शिंदे (अन्न) यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post