मुंबई - बेळगाव सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही नेते महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटकला लागून असलेल्या बेळगाव वाद संदर्भात केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची जबाबदारी घेणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये वादाचा मुद्दा ठरलेला हा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वकिलांचीही घेणार भेट
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांची सरकार एक बैठक घेणार आहे. वरिष्ठ वकील हरीश साळवे यांच्याशी सीएम ठाकरे स्वतः चर्चा करणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केली आहे. बेळगाव सीमावाद प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी महत्वाची बैठक घेतली. याच बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची नावे समन्वयक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या बेळगाव, कारवार आणि निप्पाणी या भागांवर दोन्ही सरकार दावा करत आहेत. येतील बहुसंख्य लोक मराठी भाषिक असल्याने त्यांना महाराष्ट्रात सामील करून घ्यावे असा महाराष्ट्राचा दावा आहे.
बेळगाव प्रश्न फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याचा प्रयत्न
शिवसेनेसाठी बेळगाव सीमाप्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी राष्ट्रीय पक्ष म्हणून वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापित केले आहे. तरीही सीमाप्रश्न लवकरात-लवकर निकाली काढण्यासाठी राजकीय अडथळे येऊ नयेत असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची भूमिका यावर ठाम आहे. आता सर्वांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवावा असे आवाहन ठाकरेंनी केले आहे. एवढेच नव्हे, तर यासंदर्भात फास्ट ट्रॅक निकाल लावण्यासाठी प्रयत्न करणार असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, नितीन राउत, सुभाष देसाई, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मनोहर किनेकर, अरविंद पाटील, दिगंबर पाटील आणि बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर देखील उपस्थित होते.
Post a Comment