सत्ताहरणानंतर भाजपचा ‘कार्यक्रम’ही ढेपाळला
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्याच्या सत्ता संघर्षात पिछेहाट झालेल्या भाजपच्या जिल्ह्यातील पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमाचा बोजवारा उडाला आहे. 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पक्षांतर्गत निवडीच्या प्रक्रियेत 15 डिसेंबरपर्यंत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष निवडीचे तयार केलेले वेळापत्र कोलमडले असून बूथ समिती पातळीवरील माहिती अद्याप जिल्हास्तरावर पोहचलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकार्यांनी पक्षांतर्गत निवडीचा कार्यक्रम वेळापत्रकानुसार पूर्ण होणार नसल्याचे मान्य केले असले तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्हाध्यक्षांची निवड पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच सोमवारपासून बूथ पातळीवरील माहिती, सक्रिय सभासदांची माहिती जिल्हा पातळीवर संकलित होणार असून या माहितीच्या तपासणीसाठी जिल्हा पातळीवर समिती असून ही समिती सक्रीय सभासदांची तपासणी करणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या महिन्यांत भाजप संघटन पर्व म्हणून पक्षांतर्गत निवडणूक वेळापत्रक निवडणूक अधिकारी सुरेश हळवणकर यांनी जाहीर केले होते. 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर सक्रिय सदस्य नोंदणी, 24 नोव्हेंबरपर्यंत सक्रिय सदस्य पडताळणी, 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर बूथ अध्यक्ष आणि बूथ समिती सदस्यांची निवड, 25 ते 30 नोव्हेंबरपर्यंत मंडल अध्यक्ष आणि मंडल समिती सदस्यांची निवड, 1 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष व जिल्हा समिती सदस्यांची निवड, 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातून प्रदेश परिषद सदस्य निवड, 15 डिसेंबरला प्रदेशाध्यक्षपदाची निवड असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.
राज्यातील सत्ताखेळात झालेल्या पराभवामुळे भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमधील उत्साह घसरला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नवे राजकीय समिकरण जुळविण्यात आले. महाविकास आघाडी सत्तारूढ झाल्याने अनेक नेत्यांचेे अवसान गळाले. त्याचा परिणाम संघटनात्मक निवडणुकीवर झाला. स्थानिक नेत्यांनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याने बूथस्तरावरील निवडी रखडल्या आहेत. या नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय होणे अपेक्षित आहे. पण नेतेच या प्रक्रियेपासून लांब असल्याने कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. निवड रखडल्याने पुढील मंडल म्हणजे तालुकाध्यक्षांच्या निवडी लांबणीवर पडल्या आहेत.
काय घडले ?
नगर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक खासदार गिरीश बापट यांनी जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीची माहिती दिली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी तातडीने मंडल अध्यक्ष निवडीसाठी तालुकानिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करून त्यांना वेळापत्रकाप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अजूनही बूथस्तरावरील निवडी झाल्या नाहीत. डिसेंबर महिना सुरू झाला असून या कालावधीत जिल्हाध्यक्षाची निवड प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते.
Post a Comment