मका-प्रक्रिया-उद्योग




माय अहमदनगर वेब टीम
सोयाबीनप्रमाणेच मका हे देखील प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त पीक आहे. शेतकरी बांधावरच मका प्रक्रिया उद्योग उभा करू शकतो. या माध्यमातून मक्‍याला चांगला दर मिळेल, शिवाय रोजगारनिर्मितीही होईल.

अनेक देशांमध्ये मका हे गरीब कुटुंबांचे मुख्य अन्न आहे. पारंपरिक पद्धतीने मका जात्यावर / गिरणींमध्ये दळून त्याच्या पिठाचा वापर भाकरी / रोटी बनविण्यासाठी केला जातो. अर्धपक्व झालेले दाणे भाजून त्यांचा वापर आहारात केला जातो. मका पशुखाद्य विशेषतः कुक्कुट खाद्य, तसेच त्यापासून फ्लेक्‍स तयार केले जातात.

मका दळण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने कोरडी पद्धत (ड्राय पद्धत) व ओली पद्धत वापरली जाते. कोरडी भरडण्याची पद्धत लघु कारखान्यांमध्ये वापरली जाते. सीएफटीआरआय (म्हैसूर) या अन्नावर प्रक्रिया करणाऱ्या भारत सरकारच्या संस्थेने या पद्धतीचे प्रमाणीकरण केलेले असून या पद्धतीत मक्‍याचे तुकडे 40 टक्के, अंकुर 14 टक्के, भरड मिल 20 टक्के, भुकटीयुक्त मिल 10 टक्के, पीठ 5 टक्के व इतर 10 टक्‍क्‍यांपर्यंत प्राप्त होते. मक्‍याच्या तुकड्यांचा वापर फ्लेक्‍स कागदासाठी पेस्ट व ग्लुकोज तयार करण्यासाठी केला जातो.


ओली भरडण्याची पद्धत आधुनिक समजली जात असून, या पद्धतीचा जगभर वापर केला जातो. या पद्धतीत स्टार्च उत्पादनांबरोबरच इतर उपपदार्थ, ज्यात प्रामुख्याने मका तेल, मका ग्लुटेन, मका फायबर, स्टीप द्रव इत्यादीचा समावेश होतो. या पद्धतीत स्टार्च (68 ते 62 टक्के), ग्लुटेन (सहा-आठ टक्के), अंकुर (सहा-सात टक्के), भुसा (12-14 टक्के) व द्राव्य घनपदार्थ (पाच ते सात टक्के) मिळू शकतो. स्टार्चचा वापर प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांत द्रवपदार्थ घट्ट करण्यासाठी अथवा अन्नपदार्थ एकजीव करण्यासाठी केला जातो. त्याशिवाय स्टर्चचा वापर स्वीटनर्स, सिरप, मोनोसोडियम ग्लुटामेट, बेकरी व कन्फेक्‍शनरी, आंबवण्याच्या प्रक्रियेत तसेच दुग्‌ धपदार्थ व भाजीपाला प्रक्रिया पदार्थांमध्ये सर्रास केला जातो. स्टार्चचा वापर टेक्‍स्टाईल कारखान्यांत छपाई, साइजिंग व फिनिशिंग, तसेच शिवणकामासाठी लागणाऱ्या दोऱ्याच्या उत्पादनासाठी केला जातो. स्टार्चचा वापर पेपर उद्योगात कागदाचा लगद्यामध्ये, सायजिंग व कॅलेंडरिंग प्रक्रियेत, तसेच त्याच्या चिकट या गुणधर्मामध्ये डिंक म्हणून कोरूगेटेड बोर्ड, पेपर बोर्ड, स्टॅंप्स, पाकिटे, लेबलिंगसाठी केला जातो. स्टार्चचा वापर फाउंड्री मध्ये मोल्ड एकजीव होण्यासाठी केला जातो. औषधी कारखान्यांत गोळ्यांसाठी, शरीरास वापरावयाच्या पावडरमध्ये, सर्जिकल हातमोज्यांसाठी, तसेच जैविक विघटन व्हावे या उद्देशाने विविध औषधी गोळ्यांमध्ये स्टार्चचा वापर होतो. इतर विविध ठिकाणी म्हणजे कोरडे बॅटरी सेल्स, डिटर्जंटस्‌, वेल्डिंग इलेक्‍ट्रोड, शोभेच्या दारूसाठी, हातमोजे सुकविण्यासाठी, मोल्डिंग रबर टायरसाठी, स्पार्क प्लग, तसेच खोल समुद्रात खनिज तेलाच्या उत्खननात स्टार्चचा वापर केला जातो.

बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकसाठी स्टार्चची मोठ्या प्रमाणात भविष्यात गरज पडणार आहे. मक्‍यापासून स्टार्च नि र्मिती करत असताना प्रामुख्याने प्राप्त होणारे उपपदार्थ म्हणजे ग्लुटेन मिल, जर्म (अंकुर), फायबर व स्टीप लिकर हे होत.

ग्लुटेन मिलमध्ये प्रामुख्याने प्रथिनांचे प्रमाण 69 टक्के, स्टार्च 19 टक्के, स्निग्धयुक्त पदार्थ तीन टक्के व आर्द्रता (ओलावा) प्रमाण 10 ते 12 टक्के इतके असते. मका जर्म (अंकुर) सहा ते सात टक्के या प्रमाणात असून, जर्ममध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण 22 टक्‍क्‍यांपर्यंत असते.

फायबर (तंतुमय पदार्थ)मध्ये स्टार्च 15 टक्के, प्रथिने दहा टक्के, तर स्निग्ध पदार्थांचे प्रमाण दोन टक्के असते. स्टार्चचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी ऍसिड हायड्रोलायसिस पद्धतीचा अवलंब केला जातो. अशा पद्धतीने प्राप्त झालेल्या द्रवरूप ग्लुकोजचा वापर मिठाई, कन्फेक्‍शनरी, च्युइंगम, चॉकलेट, जॅम, जेली, घरगुती वापरातील सिरप, बेबी फूड, बेकरी, कफ सिरप, पानमसाला इत्यादी अनेक पदार्थांत केला जातो. स्टार्चचे रूपा ंतर ग्लुकोज तथा इतर शर्करांमध्ये किती प्रमाणात झाले आहे याचे मापन डेक्‍स्ट्रोज इक्विव्हॅलंट (डे.इ.) या रूपाने केले जाते. स्टार्चपासून ग्लुकोज तसेच इतर शर्करांचे सिरप करण्यासाठी होतो.



विविध शर्करांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असेल :

डेक्‍स्ट्रोज मोनोहायड्रेट (डीएमएच) –  विविध अन्नपदार्थांत विशेषतः आइस्क्रीम, जॅम, जेली इत्यादीमध्ये गोडी, आस्वादवृद्धी तसेच ऊर्जेसाठी डीए मएचचा वापर घन अथवा द्रव स्वरूपात केला जातो. ब्रेडचा रंग व पोत सुधारण्यासाठी गोळ्या व चॉकलेट मध्ये, शर्करा स्फटिकीकरण टाळण्यासाठी, अँटिबायोटिक्‍स व ओरल सिरप तसेच सौरबिटाल, मॅनिटाल व ग्‌ लुकोनेट्‌स तयार करण्यासाठी डीएमएच वापरले जाते. डेक्‍स्ट्रोज अनहायड्रसचा वापर ग्लुकोज सलाईन, ऊर्जा देणाऱ्या पदार्थांतसुद्धा केला जातो.
डाक्‍स्ट्रिनचा वापर टेक्‍स्टाईल, छपाई, रंग, फाउंड्री, लेबलिंग, काडेपेटी, बॉक्‍स पॅकेजेस इ. ठिकाणी केला जातो. सौरबिटालचा वापर द्रव / स्फटिक स्वरूपात च्युइंगम, प्रसाधने, टूथपेस्ट, क जीवनसत्त्वासाठी केला जातो. मल्टोडाक्‍स्ट्रिनचा वापर बेबी फूड, बूस्ट, माल्टोव्हा, बोर्नव्हिटा, हॉर्लिक्‍स इत्यादीमध्ये केला जातो. माल्टोडाक्‍स्ट्रिनच्या वापरामुळे पाण्यात / द्रवात विरघळण्याची प्रक्रिया जलद होणे, घट्टपणा वाढणे, शर्करा स्फ टिकीकरण टाळण्यास मदत होते.

हाय माल्टोज सिरप - हा रंगहीन, गंधहीन, घट्ट असलेला गोड स्वरूपाचा सिरप असून, त्याचा वापर औषधांमध्ये तसेच गोळ्यांच्या कारखान्यांमध्ये होतो. माल्टीटॉल (कमी कॅलरी स्वीटनर) तयार करण्यासाठी, अन्नपदार्थांचे आयुर्मान वाढीसाठी, जैविक वाढ टाळण्यासाठी, तसेच गोडी कमी करण्यासाठी हायमाल्टोज सिरपचा वापर केला जातो. हाय माल्टोज सिरपचा वापर सॉफ्ट ड्रिंक्‍स, बेकरी, कन्फेक्‍शनरी, कडक गोळ्या, कॅंडीज, आइस्क्रीम, आयसिंग, करॅमलसाठी केला जातो.

हाय फ्रुक्‍टोज सिरप (एचएफसी)- एचएफसीची गोडी डेक्‍स्ट्रोजच्या दुप्पट असून, उसापासूनच्या शर्करेऐवजी सॉफ्ट सॉफ्ट ड्रिंक्‍समध्ये एचएफसीचा वापर केला जातो.

सायट्रिक ऍसिड – वितंचकाच्या साहाय्याने आंबवण प्रक्रियेच्या माध्यमातून डेक्‍स्ट्रोजचे रूपांतर सायट्रिक ऍसिडमध्ये केले जाते. अन्नप्रक्रिया व औषधांमध्ये त्याचा वापर प्रिझर्वेटिव्ह तसेच चवीत सुधारणा करण्यासाठी केला जातो.

मक्‍यापासून स्टार्च या उद्योगाचे स्थान

अ) जागतिक स्तरावरील स्थिती : जगात उत्पादित होणाऱ्या स्टार्चपैकी 83 टक्के स्टार्च मक्‍यापासून, सहा टक्के स्टार्च बटाट्यापासून, सहा टक्के स्टार्च साबुदाणा माध्यमातून, चार टक्के स्टार्च गव्हापासून, तर एक टक्का स्टार्च तांदळापासून तयार केला जातो. एकंदर उत्पादित होणाऱ्या स्टार्चपैकी यूएसए 51 टक्के, युरोप 17 टक्के, तर उर्वरित स्टार्च इतर देशांत होतो. जागतिक स्तरावर स्टार्चची गरज प्रति वर्षी चार टक्‍क्‍याने वाढत आहे. प्रगत देशांमध्ये स्टार्च सिरपला स्टार्च भुकटीपेक्षा जास्त मागणी असून, याच्या उलट स्थिती मागासलेल्या देशा ंमध्ये आहे. नेटिव्ह व मॉडिफाइड स्टार्चची निर्यात करणाऱ्या देशांमध्ये युरोपीय देश आघाडीवर असून, त्यानं तर यूएसए व थायलंडचा नंबर लागतो. स्टार्चचा जास्त वापर रणाऱ्या देशांत अमेरिका, युरोप, चीन व भारताचा नंबर लागतो. अमेरिकेत प्रति व्यक्ती प्रति वर्षी स्टार्चची गरज 8.4 किलो, तर भारतात ती फक्त 0.4 किलो इतकी आहे.

ब) भारतातील स्थिती : मका ओल्या स्वरूपात भरडण्याची प्रक्रिया आपल्या देशात प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र , मध्य प्रदेश, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड इ. राज्यांत असून, अशा 20 स्टार्च उद्योगांची दैनंदिन क्षमता 4325 मे. टन इतकी आहे. महाराष्ट्रात स्टार्च उत्पादन करणारे सहा उद्योगसमूह असून, त्यांची दैनंदिन क्षमता 950 मे. टन इतकी आहे.

मका प्रक्रियेचे पणन

मक्‍यावर प्रक्रिया करून कॉर्नफ्लेक्‍स, कॉर्नपॉप्स, कॉर्नचिप्स, स्टार्च, स्टार्चवर आधारित विविध मूल्यवर्धित पदार्थ विशेषतः स्वीटनट्‌स, इथेनॉल, उपपदार्थ की ज्यांत खाद्यतेल, ग्लुटेन मिल, फायबर इ. तयार करता येऊ शकतात. स्टार्चचे हजारो उपयोग असून, त्याची माहिती वर आलेली आहेच. टेक्‍स्टाईल, अन्नप्रक्रिया उद्योग, औषधे, पेपर, हॉटेल, रेस्टॉरंट व इतर विविध कारखाने वाढत आहेत. उपपदार्थांमध्ये ग्लुटेन मिल व फायबर्स यांचा वापर पशुखाद्य विशेषतः कुक्कुटपालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात होत आहे. जर्म ऑईलमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. स्टार्च प्रक्रियेत प्राप्त होणाऱ्या स्टीप लिकरचा वापर जैविक उत्पादने व अँटिबायोटिक्‍स उत्पादनात कल्चर मेडियासाठी होत आहे.

भारतात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद व कोलकता ही शहरे स्टार्च विक्रीसाठी केंद्रे आहेत, त्याशिवाय स्टार्च व इतर आधारित उद्योगांतील उत्पादित मालासाठी भोपाळ, हैदराबाद, चंडीगड, लखनौ, बंगलोर इ. शहरांचासुद्धा विचार करणे आवश्‍यक आहे. मक्‍यापासून स्टार्च व त्यावर आधारित उत्पादने करणाऱ्या बहुतांशी उद्योजकांची विक्रीची केंद्रे मुंबई व अहमदाबाद या ठिकाणी आहेत. उद्योजक त्यांचा माल स्वतः अथवा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित कारखान्यांना विकतात. त्याशिवाय स्टार्च व ग्लुटेन मिलला निर्यातीस वाव असून, त्यांची निर्यात श्रीलंका, दक्षिण – पूर्व आशिया, बांगला देश, दक्षिण आफ्रिका इ. देशांत करता येऊ शकते.

अमेरिकेतील कॅलाग कंपनीचा कॉर्नफ्लेक्‍स बनविण्याचा मोठा कारखाना आहे. फ्लेक्‍समध्ये आयर्न व क जीवनसत्त्वाशिवाय विविध प्रकारचे स्वाद (केळी, स्ट्रॉबेरी, आंबा, बदाम इ.) दिले जातात.

हे कॉर्नफ्लेक्‍स रु. 130 प्रति 450 ग्रॅम भावाने आपल्या राज्यात विकले जाते. या एकाच उदाहरणावरून मक्‍याच्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर मूल्यवर्धन करता येऊ शकते याची कल्पना येऊ शकते.

उद्योगातील जोखमीबाबतचे विश्‍लेषण

– कच्चा माल उपलब्धतेबाबत प्रश्‍न निर्माण होणे.

– दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्ती येणे.

सामाजिक व आर्थिक परिणाम

– शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळून त्यास आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होऊ शकते.

– पर्यावरणविषयक काळजी न घेतल्यास परिसरातील पर्यावरण बिघडू शकते.

–रोजगार निर्मिती :

मक्‍यापासून स्टार्चनिर्मिती या उद्योगापासून (100 टन प्रति दिन क्षमता) 70 लोकांना प्रत्यक्ष, तर 280 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

निष्कर्ष

– मका आधारित अनेक उद्योग उभारून मूल्यवर्धन केल्यामुळे शेतकऱ्यास त्याच्या मालाला भाव तर मिळेलच, त्याशिवाय ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकते.

– महाराष्ट्रात साखर कारखानदारीचे जाळे असल्याने, तसेच बहुतांशी भागात पट्टा पद्धतीचा अवलंब ऊस लागवडीसाठी शेतकरी करीत आहेत, त्यामुळे मका व चवळी ही मिश्र आंतरपिके पट्ट्यात घेतल्यास व ज मिनीचा पोत टिकविल्यास शेतकऱ्यास उसाशिवाय मक्‍यापासून चांगले उत्पादन मिळू शकते व हा कच्चा माल प्रक्रिया उद्योगासाठी वापरता येऊ शकतो.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post