अठरा नगरसेवकांचे तीन जागांसाठी अर्ज
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा नियोजन समितीमध्ये ग्रामीण निर्वाचन क्षेत्राची म्हणजे जिल्हा परिषदेची एक, महापालिकेच्या तीन व लहान नागरी क्षेत्राची नगरपालिकेची एक, अशा एकूण पाच जागा रिक्त आहेत. या पाच रिक्त सदस्यांच्या निवडीसाठी २४ डिसेंबरला निवडणूक होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी (५ डिसेंबर) शेवटची मुदत होती. ही मुदत संपेपर्यंत महापालिकेच्या रिक्त असणाऱ्या तीन जागांसाठी तब्बल अठरा नगरसेवकांनी, नगरपालिकेच्या रिक्त असणाऱ्या एका जागेसाठी सहा जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. दरम्यान, या समितीमध्ये जिल्हा परिषदेची एक रिक्त जागा आहे. या जागेसाठी केवळ धनराज शिवाजीराजे गाडे यांचा उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनासाठीच्या समितीमध्ये पाच जागा रिक्त आहेत. त्यामध्ये महापालिकेची सर्वसाधारण प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला प्रवर्गाची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगरसेवक सुभाष लोंढे, ज्ञानेश्वर येवले, सागर बोरुडे, सुनील त्रिंबके, अनिल शिंदे, मनोज कोतकर या सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त जागेसाठी नगरसेवक अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, सुवर्णा जाधव व मनोज दुलम या चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तब्बल आठ जणांनी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये नगरसेवक मीना चोपडा, ज्योती गाडे, संध्या पवार, रूपाली वारे, रिजवाना शेख, सुनीता कोतकर, आशा कराळे, सोनाली चितळे यांचा समावेश आहे. नियोजन समितीमध्ये नगरपालिकेची सर्वसाधारण प्रवर्गाची एक जागा रिक्त असून त्यासाठी सूर्यकांत भुजाडी (राहुरी), गणेश भोस (श्रीगोंदा), मंदार पहाडे (कोपरगाव), शहाजी खेतमाळीस (श्रीगोंदा), आसाराम खेंडके (श्रीगोंदा) व रमेश लाढाणे (श्रीगोंदा) या सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता शुक्रवारी (६ डिसेंबर) या अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख १६ डिसेंबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी १७ डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून २४ डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत महासैनिक लॉन येथे मतदान होणार आहे. तर, निवडणुकीची मतमोजणी २६ डिसेंबरला सकाळी नऊपासून महासैनिक लॉन येथे सुरू होणार आहे.
Post a Comment