माय अहमदनगर वेब टीम
उन्हाळ्यामध्ये चाखता येणाऱ्या अनेक फळांपैकी कलिंगड हे अतिशय मधुर आणि रसाळ फळ आहे. पण बाजारातून कलिंगड आणताना ते चवीला नेमके कसे असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. पण हे काम आपल्याला वाटते तेवढेही अवघड नाही. अर्थात, प्रत्येकाची कलिंगड निवडण्याची पद्धत वेगळी असते. कोणी कलिंगडावर मुठीने मारून बघतात, तर कोणी कलिंगडाचा वास घेऊन पाहतात, तर कोणी कलिंगड हाताने दाबून बघतात, अश्या एक ना अनेक पद्धती आजमावतना आपण लोकांना बघत असतो. आणि इतके केल्यानंतरही आपण निवडलेले कलिंगड मधुर आणि रसाळ असेलच याची काहीही शाश्वती नसते. तर मग चवीला गोड आणि रसदार कलिंगड निवडायचे तरी कसे? तर सर्वप्रथम , कलिंगड घेताना त्यावरील ' फील्ड स्पॉट ' पाहून घ्यावा. कलिंगडाचा रंग जरी हिरवा असला तरी ते सर्व बाजूंनी एकसारखे हिरवे दिसत नाही. त्याचा रंग कुठे गडद, तर कुठे अगदी फिक्कट असा दिसतो. त्या फिक्कट रंगाच्या भागालाच फील्ड स्पॉट असे म्हटले जाते. हा फील्ड स्पॉट साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचा दिसतो. कलिंगडाचा रंग जितका गडद असतो, तितके ते वेलीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ राहिले असावे असे म्हटले जाते. तसेच ज्या कलिंगडावर फील्ड स्पॉट अजिबात दिसत नाही, ते कलिंगड वेलीवरून वेळेआधीच तोडले गेले आहे असे समजावे.
कलिंगडावर दिसणाऱ्या रेषांच्या जाळ्यावरूनही कलिंगड चवीला कितपत गोड असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. आपण कलिंगड निवडताना अगदी नितळ दिसणाऱ्या सालीचे कलिंगड निवडतो. पण तसे न करता ज्या कलिंगडाच्या सालीवर रेघांचे जाळे दिसेल, असेच कलिंगड निवडावे. असे सांगितले जाते की कलिंगडाचे फळामध्ये रूपांतर होण्याआधी जे फूल असते, त्या फुलातुन मधमाश्यांनी जास्त मध शोषले असल्यास, त्या फुलापासून तयार होणारे कलिंगड चवीला जास्त गोड असून, त्याच्या सालीवर रेघांचे जाळे दिसून येते.
कलिंगडामध्येही नर आणि मादी हा लिंगभेद आहे, हे आपल्यापैकी फार कमी जणांना ठाऊक असेल. नर - कलिंगडे ही आकाराने मोठी आणि लंबगोल अशी दिसतात, तर मादी - कलिंगडे आकाराने लहान असून गोल दिसतात. नर कलिंगडे आकाराने मोठी आणि जास्त रसाळ असून मादी कलिंगडे चवीला जास्त गोड असतात. कलिंगड विकत घेताना त्याच्या आकाराचा ही विचार करावयास हवा. जास्त मोठे आणि वजनदार कलिंगड चवीला मधुर आणि रसदार असेलच असे नाही. त्यामुळे कलिंगड विकत घेताना फार मोठे किंवा फार लहान ना घेता मध्यम आकाराचे घ्यावे.
Post a Comment