गुलाबवाडी होणार ‘गुलाबी गाव’
माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गावाला गुलाबी गाव अशी ओळख जितेंद्र गवळी या शिक्षकाने करून दिली. आता रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गुलाबवाडी गावाला ‘पिंक व्हिलेज’ करण्याचा विडा उचलला आहे.
500 लोकसंख्या आणि 170 घरे असलेल्या या गावात 25 डिसेंबरपर्यंत संपूर्ण घरांना गुलाबी रंग लावून महिला सक्षमीकरण गजर केला जाणार आहे.
रावेर तालुक्यातील पाल येथील जितेंद्र गवळी नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात कार्यरत असताना भिंतघर गावाला ‘पिंक व्हिलेज’ करण्यासाठी पुढाकार घेतला. आता त्यांनी रावेर तालुक्यातील गुलाबवाडी गावाला ‘पिंक व्हिलेज’ गाव करण्यासाठी संकल्प केला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून या गावात हे शिक्षक शाळा सुटल्यावर जाऊन गावकर्यांच्या गाठी भेटी घेतात. सर्वच गावकर्यांकडून त्यांच्या या संकल्पनेला होकर मिळत आहे.
प्रत्येक कुटुंबांकडून प्रत्येकी 500 रुपये वर्गणी जमा करून गावाला रंगरंगोटी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ओला सुका कचरा संकलित करणे, रस्त्यावर सडा-रांगोळी घालून रस्ते सुशोभित करणे, गुरांच्या गोठ्यात स्वच्छता राखणे, मुलांचे गणवेश, त्यांना नीट नेटके ठेवण्यासाठी पालकांना मार्गदर्शन, भिंतीवर प्रबोधन करतील अशा सुरेख म्हणी, नागरिकांना वृक्ष तोडीपासून परावृत्त करणे, प्लास्टिक बंदी, गलुल बंदी, हुंडाबंदी यासारख्या सामाजिक प्रथांना रोखण्यासाठी गावकर्यांना संघटीत केले जात आहे. यासाठी गावकर्यांची आदर्श ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे गावात राबवण्यात येणार्या विविध उपक्रमावर ऊहापोह केला जातो.
चार महिन्यांपूर्वी जितेंद्र गवळी आले तेव्हा नागरिकांना अनुत्साह होता. यापूर्वी गावातील जवळपास 10 जण किडनीच्या आजाराने दगावले असल्याने नागरिक हताश झाले होते.
त्यांना या संकल्पना आणि उपक्रमात काही रस नव्हता. मात्र गवळी यांनी हार न मानता गावकर्यांच्या भावनांना साद घालून सर्वांची मते परिवर्तीत केले. नागरिकांना गावात पडणार्या पावसांची नोंद करण्यासाठी पर्जन्यमापक लावण्यास उद्युक्त केले.
आता गावाला रंग-रंगोटी सुरू आहे. 25 डिसेंबर रोजी ब्रह्मलीन प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांच्या पुण्यतिथीपासून गावाला ‘पिंक व्हिलेज’ म्हणून ओळखले जाणार असल्याचा विश्वास जितेंद्र गवळी यांना आहे.
Post a Comment