माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी (दि.२) झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा गावरान कांदा तसेच लाल कांद्यालाही विक्रमी १००, 120, 130 रुपये किलोचा भाव मिळाला. गतवर्षीचा दुष्काळ आणि यावर्षीची अतिवृष्टी यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या महिन्यापासून कांद्याची आवक कमी होत आहे, तर देशभरात मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी होत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून कांद्याचे भाव वाढले आहेत. मागील काही दिवसात कांद्याचा भाव साधारणपणे ८२ रुपयांपर्यंत गेला होता. शनिवार (दि.३०) पासून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले आहेत. पहिल्याच लिलावात गावरान कांद्याला ८२ रुपये तर लाल कांद्याला ६२ रुपये दर मिळाला होता. सोमवारी (दि.२) रोटेशन पद्धतीने दुसरा लिलाव होता. त्यासाठी सुमारे १५ हजार गोण्या कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. कांद्याला मागणी असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी चांगल्या कांद्याच्या लिलावाला जास्त बोली लावली. चांगल्या दर्जाच्या गावरान कांद्याला उच्चांकी भाव क्विंटलला १० हजार रुपये तर लाल कांद्यालाही क्विंटलला १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. या वर्षीचा हा उच्चांकी भाव आहे असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे, निरीक्षक जयसिंग भोर व संजय काळे यांनी सांगितले.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत असल्याने देशभरात हा कांदा विक्रीला जातो. सोमवारच्या लिलावात मिळालेला भाव राज्यात सर्वाधिक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्याच्याा तुलनेत या लिलावात तब्बल दुप्पट भाव वाढला आहे. अनेक कांदा उत्पादकांनी यापूर्वी कांदा विकला असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत आवकही निम्म्याने घटली आहे. त्यामुळे भावात वाढ होत आहे कांदा उत्पादकांना अलीकडच्या काळात पहिल्यांदाच चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
Post a Comment