गडाखांना कॅबिनेट, तनपुरेंना राज्यमंत्रिपद
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला विस्तार पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.
यात नगर जिल्ह्यातील नेवाशाचे ‘क्रांतिकारी’चे आमदार शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट पदाची तर राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्रिपदाची शपथ घेतल्याने जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या तीन झाली आहे. शंकरराव गडाखांच्या रुपाने नेवाशाला आणि प्राजक्त तनपुरेंच्यारूपाने राहुरीला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने दोन्हीही तालुक्यांत समर्थकांनी जल्लोष केला.
काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. आतापर्यंत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचेच वर्चस्व दिसते.
दरम्यान, उद्या अथवा परवा खातेवाटप जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. कुणाला कोणते खाते दिले जाते याबाबत उत्सुकता आहे.
Post a Comment