'ते' भाजप प्रवेशाच्या विचारात होते


माय अहमदनगर वेब टीम
लोणी/अहमदनगर – दोन वर्षांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातच भाजप प्रवेशाच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री तथा भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. दिल्लीत कधी, कोणाला जाऊन भेटले हे स्पष्ट करण्याची गरज नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये जाण्याचा राजकीय निर्णय घेतला होता. पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. असे म्हणाले

आपण मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटलोच नाही. बदनामीसाठी बातम्या पेरणार्‍यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विखे यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा ऐन जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीमवर थोरात-विखे वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

आमदार विखे पुन्हा परतीच्या मार्गावर असल्याचे वृत्त एका वेबपोर्टलने दिल्यानंतर विविध चर्चांना सुरुवात झाली होती. या चर्चांचे आ.विखे यांनी खंडण केले आहे. बदनामीसाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यम प्रतिनिधींनी त्यांना काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री थोरात यांनी ‘दिल्या घरी सुखी रहा’ असा सल्ला दिल्याची आठवण करून दिली.

यावर प्रतिक्रिया देताना आ. विखेंनी ‘तेच भाजपात जाण्याच्या विचारात होते’ असा गौप्यस्फोट केला. दोन वर्षांपूर्वी दिल्लीत कोणत्या नेत्याला जाऊन भेटले होते, हे सांगण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ना. थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडले. थोरात यांना अपघाताने सर्व मिळाले आहे. यात थोरातांचे काही कर्तृत्व नाही. साडेचार वर्षे मी विरोधी पक्षनेता म्हणून राज्यात केलेल्या कामामुळे आज काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत.

त्यावेळी सभागृहात आणि सभागृहाबाहेर आम्ही भांडलो. तेव्हा साडेचार वर्षे थोरात तर गायब होते. सभागृहात किंवा सभागृहाबाहेर ते काही बोलतच नव्हते. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा फुटबॉल झाला आहे. स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांंक्षेसाठी काँग्रेस पक्ष सेना-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला आहे. पक्षीय भुमिकेबद्दल त्यांनी काही सांगू नये. विधानसभा निवडणूक काळात भाड्याने आणलेले हेलिकॉप्टर संगमनेरलाच मुक्कामाला ठेवले होते. त्यांनी माझी चिंता करू नये, असे आ.विखे म्हणाले.

काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, मी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये जाण्याच्या राजकीय भूमिकेतून निर्णय घेतला होता. मी सत्तेसाठी भाजपमध्ये गेलो नाही. तात्विक मतभेदांमुळे आपण पक्ष सोडला. खर्गे हे जेष्ठ नेते आहेत व त्यांच्याबद्दल मला आदर आहे.

मी गेल्या तीस वर्षांपासून सभागृहाचा सदस्य असल्याने अनेक पक्षातील लोक मित्र आहेत. इतरांचा आदर करण्याची आपली संस्कृती आहे. एकमेकांना भेटू नये, असे कुणाला वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे. मी खर्गे यांची भेटच घेतली नाही तरी भेट घेतल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. हे बदनामीकारक असून बातम्या कोण पेरत आहे याचा मुळापर्यंत जाण्यासाठी आपण पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी लोणी येथे बोलताना सांगीतले.

कर्जमाफीत शेतकर्‍यांची घोर फसवणूक
राज्य सरकार गोंधळलेल्या स्थितीत असून, सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणार्‍या या सरकारकडून कर्जमाफीत शेतकर्‍यांची घोर फसवणूक झाली आहे, असा आरोप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते म्हणाले, विधानसभेत कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. कर्जमाफीचे निघालेले परिपत्रक पाहता त्यामध्ये अटीच अटी आहेत. ही शेतकर्‍यांची फसवणूक आहे. एकदा काढलेले परिपत्रक रद्द करून पुन्हा नवीन काढण्याची वेळ एकाच दिवसात या सरकारवर आली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता ही मागणी करणारे ठाकरेच मुख्यमंत्री आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांना या घोषणेची आठवण करून देत शेतकर्‍यांना 25 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी विधानसभेत केली होती. मात्र ठाकरे यांनी ते केले नाही. शेतकर्‍यांची बोळवण या सरकारने केली आहे. या सरकारवर शेतकर्‍यांनी कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post