बसस्थानकात जपला जातोय माणुसकीचा झरा




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पैसा म्हटला की प्रत्येकाला त्याची हाव असते. कोणत्याही मार्गाने पैसा मिळवला पाहिजे ही प्रवृत्ती सर्वत्र आढळते. परंतु अशाही परिस्थितीत पैशाला दुय्यमस्थानी ठेवणारा एक अवलिया नगर मधील माळीवाडा बसस्थानकात आपले माणूसपण जपताना दिसत आहे. स्वाभिमानी व स्वावलंबी दिव्यांग प्रेमकुमार सामानुमल तहेलरामाणी उर्फ जॉनी काका गेल्या 25 वर्षापासून ठरताहेत अबाल-वृद्धासह महिला आणि शाळकरी मुलींचा व नवख्या प्रवाशांचा मदतीचा आधार. आज स्वार्थाचा वणवा जगभर पसरलेला असताना जॉनी काकांचे कार्य खरोखरच स्तुत्य असून सर्व धडधाकट समाज घटकांना आदर्शवत ठरणार आहे.

नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकात जॉनी काका आपले एसटीडी बूथ चालवतात. आपला व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून ते आता प्रवाशांचे आधारवड बनले आहेत. बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना कोणती बस किती वाजता सुटेल व कोणती बस किती वाजता येईल याचा अचूक अंदाज व्यक्त करत मदतीचा हात देतात. काकांनी जणुकाही वेळापत्रक अगदी तोंड पाठ करून ठेवलेलं आहे. एकवेळ बसस्थानकातील नियंत्रण कक्षाकडे बसेसची विचारपूस करण्याआधी काकांकडे जाऊन विचारपूस केली तर लगेच माहिती मिळते. अगदी बस स्थानकातून बसेस बाहेर पडेपर्यंत विचारपूस करणार्‍यांना बसमध्ये बसेपर्यंत काका मदत करतात. ते एकप्रकारे निरक्षर-अडाणी लोक, शाळा महाविद्यालयातील मुली, महिला, अंध, दिव्यांग व्यक्तींचा आधार बनले आहेत.

वय वर्ष 57 असलेल्या काकांचे वडील तहेलरामाणी हे मूळचे पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातील सखर या गावचे. 1947 साली झालेल्या भारत-पाकिस्तानच्या फाळणी दरम्यान तहेलरामाणी यांचे कुटुंब नगरमध्ये आले. यानंतर ते सर्जेपुरा येथील इ. 7 वी पर्यंत असलेल्या सिंधी शाळेचे मुख्याध्यापक झाले. त्यांना तीन मुले. तिसर्‍या क्रमांकाचे प्रेमकुमार यांचा जन्म नगर येथे होऊन जॉनी या नावाने ते परिचित झाले. दहावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ रिक्षा चालवली. यानंतर 1995 पासून ते आजपर्यंत ते माळीवाडा बसस्थानकात आपला व्यवसाय सांभाळत आहेत.

दिव्यांग असलेले जॉनी काका एखाद्या विद्यार्थिनीची कधी बस सुटली, उशीर झाला तर थेट विद्यार्थिनीच्या घरच्यांशी संपर्क करून त्यांना माहिती देतात. आणि जोपर्यंत दुसरी बस येत नाही आणि त्या मुली सुखरूपपणे बसमध्ये बसत नाहीत तोपर्यंत हे काका त्या मुलींच्या आधाराची काठी बनतात.25 वर्षापासून या सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या काकांची आजही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेल्या, तसेच विवाह झालेल्या विद्यार्थिनी बसस्थानकात येऊन आवर्जून विचापूस करतात. आपल्या कामाचे हेच फळ असून यापुढेही असाच ऋणानुबंध जपणार असल्याचे ते सांगतात.

काका व त्यांची पत्नी जया हे दोघेही दिव्यांग असून कोणापुढे हात न पसरवता व कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता त्यांनी अपंगत्वावर मात करत छोटासा व्यवसाय सुरू केला. मात्र, व्यवसाय करत असताना सामाजीक जाणिवेच्या भावनेतून बसस्थानकावर आलेल्या आगंतुकांना, ग्रामीण भागातून आलेल्या महिला-मुलींना मदत व्हावी यादृष्टीने त्यांनी उचललेले पाऊल हे मनाची संवेदनशीलता गोठलेल्या तरुणाईला प्रेरणादायी ठरू पहात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post