कर्जत – पूर्वीच्या काळी कुकडी कार्यालयात आधिकारीच नव्हते मग पाणी व शेतकर्यांचे जमिनीचे पैसे कसे मिळणार? पाठपुरावाच केला गेला नाही अशी टीका आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर आज कोळवडी येथे बोलताना केली.
कुकडी प्रकल्पासाठी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकर्यांच्या जमिनी शासनाकडून संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांना कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला अनेक वर्षापासून मिळालेला नव्हता. आमदार रोहित पवार यांनी मात्र आमदार होण्यापूर्वीपासून शासन दरबारी या बाबत पाठपुरावा करून सुमारे 54 भू संपादन प्रस्ताव मंजूर करून घेतले. यामधील जळकेवाडी गावतील शेतकर्यांना कोळवडी येथील कुकडी कार्यालयामध्ये काल धनादेश देण्यात आले.
यावेळी आमदार रोहित पवार, कृष्णाखोरे महामंडळाचे आधीक्षक आभियंता एच. टी. धुमाळ, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, कार्यकारी आभियंता रामदास जगताप, संभाजी दरेकर, कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, राजेंद्र गुंड, तालुका अध्यक्ष किरण पाटील, कैलास शेवाळे, प्रवीण घुले, शंकर देशमुख, अशोक जायभाय, नानासाहेब निकत, विजय मोढळे, सरपंच काका शेळके, मुबारक मोगल यांच्यासह अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
आमदार रोहीत पवार म्हणाले, की कर्जत तालुक्यातील 104 गावांतील शेतकर्यांच्या जमिनी कुकडी प्रकल्पामध्ये गेल्या आहेत आणि त्यांचा मोबदला अनेक वर्षापासून मिळत नव्हता. याचे कारण या पूर्वी कोणीही त्याचा पाठपुरावा केला नाही. या कोळवडी कार्यालयास अधिकारी देखील नव्हता. आपण आता अधिकारी दिला आहे. येथे कोणीच नसल्याने मग शेतकर्यांना पैसे कसे मिळणार? मात्र मी या बाबत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी यांनी माझ्याकडे सतत मागणी केली व महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी सहकार्य केले. यामुळे राशीन, येसवडी, धालवडी, बारडगाव दगडी, तळवडी अशा एकूण 6 गावांचा भू संपादन मोबदला मंजूर झाला असून उर्वरीत गावांनाही हा मोबदला मिळण्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे. मंजूर झालेल्या 6 गावांना सुमारे 26 कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे.पहिल्या टप्प्यात जळकेवाडी गावातील 62 लाभार्थीना 6 कोटी 85 लाखांचा मोबदला प्रातिनिधीक स्वरूपात आज देत आहोत.
यावेळी अधीक्षक आभियंता एच. टी. धुमाळ म्हणाले, की कर्जत तालुक्यातील शेतकर्यांचा कुकडी प्रकल्पासाठी संपदित केलेल्या जमिनीचा मोबदला अनेक वर्षा पासून मिळाला नाही हे खरे आहे. यामध्ये अनेक अडचणी होत्या. आज काही शेतकर्यांना मोबदला दिला असून उर्वरीत शेतकर्यांना मोबदला देण्यासाठी आमचा विभाग पुढील काळात उपलब्ध कर्मचार्यांच्या संख्येवर देखील चांगले काम करेल. दरमहा किमान 15 प्रस्ताव तयार होतील.
प्रांतााधिकारी अर्चना नष्टे म्हणाल्या, कर्जत तालुक्यातील 54 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पूर्वीच्या 1894 च्या कायद्यात बदल झाला असून आता नव्याने झालेल्या कायद्याप्रमाणे जमिनीचा मोबदला देण्यात येत आहे. मात्र याला वेग येण्यासाठी शेतकर्यांनी देखील खरेदी देणे यासह सर्व बाबी पूर्ण कराव्यात. यामुळे आम्हाला प्रस्ताव पूर्ण करण्यात अडचणी येणार नाहीत.
यावेळी मुबारक मोगल म्हणाले की गेली 25 वर्षे शेतकरी वाट पाहत होता. मात्र पूर्वीचे रेल्वे इंजीन बंद पडलेले होते. आता नवीन आमदार झाले आहेत. यामुळे कामांना वेग आला आहे. येसवडी चारीसह दुर्गावचे शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी. यावेळी बाळासाहेब सांळुके, कैलास शेवाळे, विजय मोढळे, प्रवीण घुले, तात्या ढेरे, चमस थोरात यासह अनेकांनी विविध सूचना मांडल्या. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता रामदास जगताप यांनी केले.
कुकडी कार्यालय निर्मितीनंतर मंडप
कर्जत तालुक्यातील कोळवडी गावातील कुकडी कार्यालय हे ज्यावेळी येथे 35 वर्षापूर्वी तयार झाले, त्यावेळी मंडप आणि कार्यक्रम झाला होता आज या कार्यालयाची व परिसराची मोठी दुरवस्था झाली आहे. मात्र आज येथे एवढ्या वर्षांनी मंडप टाकण्यात आला. आणि मोठ्या संख्येने शेतकरी व अन्य नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की आता हे कार्यालय उघडे असलेले दिसून येईल.
Post a Comment