' या ' मंदिरात १ जानेवारीपासून मोबाइल बंदी



माय अहमदनगर वेब टीम
पंढरपूर - विठ्ठल मंदिरात १ जानेवारीपासून भाविकांना मोबाईल नेण्यास बंदीचा वादग्रस्त निर्णय भाजपच्या मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेत पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले असून भाविकांच्या रेट्यानंतर मंदिरात मोबाईल नेण्यास यापूर्वी शासनाने परवानगी दिली होती. आता पुन्हा समितीने आज हा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
मोबाईल ही भाविकांची गरज असल्याने वयस्कर भाविक आपल्यासोबत मोबाईल ठेवत असतात. मंदिर समितीने पूर्वी सुरक्षेच्या कारणावरून मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्यावर मंदिर परिसरात मोबाईल लॉकरच्या नावाने पैसे वसूल करण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. यात अनेक गैरप्रकारामुळे भाविकांची फसवणूक होत असल्याचाही दावा करण्यात आला होता. या प्रकाराविरोधात वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आवाज उठविल्यावर मंदिरातील मोबाईल बंदी उठविण्यात आली होती. आज पुन्हा मंदिरात मोबाईल बंदी करून समितीने मोबाईल लॉकरचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना खुश केले आहे. विठुरायासमोर अनेक भाविक फोटो काढतात असे कारण देत ही मोबाईल बंदी घातली. मात्र, फोटो काढायचे प्रकार हे राजकीय व उद्योगपती यांच्याकडून होतो. मंदिर समितीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य भाविकांना बसणार असल्याचा आरोप होत आहे. या मोबाईल बंदीमुळे वयस्कर भाविकांच्या त्रासात भर पडणार असून आता आधी मोबाईल ठेवण्यासाठी पैसे मोजायचे आणि पुन्हा आपल्या माणसांना शोधण्यासाठी वेळ घालवावा लागणार आहे. राज्यात सरकार बदलल्याने आता पुन्हा लवकरच नवीन मंदिर समिती अस्तित्वात येणार असताना या जुन्या समितीने असे वादग्रस्त निर्णय का घेतला असा सवाल भाविकांना पडला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post