मुंबई - ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी म्हणत विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्या आगमनाचे भाकीत केले आहे. विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात घोषणा केली, त्यानंतर भाजपा सदस्यांसह सर्वच सदस्यांनी बाके वाजवुन त्यांचे स्वागत केले. सत्ताधारी पक्षांनी गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या राजकीय परिस्थितीची आठवण करुन देत देवेंद्र फडणवीस यांना राजकीय चिमटे काढले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या वेळी फडणवीस यांना टोले मारायची संधी सोडली नाही…
आपण तर गेले २५-३० वर्षे एकत्र आहोत. मित्र होते ते विरोधात बसलेत, तुम्ही मित्रत्व जपले असते तर आज मी घरात बसुन विधीमंडळाचे हे प्रक्षेपण पाहीले असते पण आता विरोधी पक्ष सोबत आलेत आणि मित्र विरोधी बाकांवर बसलेत असा टोला मारत या अर्थाने खरे तर विरोधक कुणीच नाही. विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे, तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको. कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या ठरावावेळी केले.
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे फडणवीस म्हणाले होते, पण मी पुन्हा येऊन कुठल्या जागेवर बसेन हे मात्र त्यांनी सांगितले नव्हते. ते सभागृहात पुन्हा आले आहेत, केवळ जागा बदलली आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर शेलकी टीका केली. संसदीय लोकशाहीत मुख्यमंत्री पदा इतकेच विरोधी पक्षनेतेपदही महत्वाचे असते, त्यामुळे फडणवीस आपली ही जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडतील, यात आम्हाला शंका नाही, अशा शब्दात पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अभिनंदनाच्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की प्रेमाचे, जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध राजकारणापलिकडे असतात. ‘जनतेकडून त्यांच्या मनात ज्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत; तसेच मुख्यमंत्र्यांच्याही महाराष्ट्राच्या विकासासाठी काही योजना असतील, त्या सर्वांसाठी आम्ही त्यांना सहकार्य करू,’ मात्र जेव्हा जेव्हा सरकारचे नियमानुसार काम होणार नाही तेव्हा आसुड ओढल्याशिवाय रहाणार नाही, विरोधी पक्ष म्हणजे केवळ शत्रु नाही, तर वैचारीक विरोधक म्हणुन एकमेकाच्या विरोधात बसलो आहोत, मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा…अशा शब्दांत विधानसभेतील फडणवीस यांनी त्यांच्यावरील टीकेला सभागृहात उत्तर दिले
.’मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी त्यांनी म्हटल्या. ‘लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ४० टक्के मिळालेले तिघे १२० टक्क्यांनी मेरिटमध्ये आले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी नव्या सरकारच्या आघाडीची आकडेमोड केली.मुख्यमंत्र्यांनी कधीही आवाज दिला तरी जनतेच्या प्रश्नासाठी आपली भुमिका सकारात्मक असेल असेही त्यांनी या वेळी सांगितले..
Post a Comment