उत्तर महाराष्ट्र, विदर्भात हुडहुडी
माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - राज्यात गेल्या महिन्यात अरबी समुद्रावर आलेल्या क्यार वादळाच्या तडाखानंतर गेल्या आठवड्यात आलेल्या दोन वादळाने राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर हवामानाचा फटका बसला. या दोन्ही घटनानंतर राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस पडल्याने थंडी लांबली होती. पण उशिरा का होईना, आता शनिवारपासून (दि.७) राज्यात थंडी जाणवू लागली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पारा ११ ते १४ अंशापर्यत आल्याने थंडी जाणवू लागली आहे. नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपुर्वी २० अंशापर्यत असलेला पारा आज १३ अंशावर आल्याने थंडीस प्रारंभ झाला आहे.नोव्हेंबर महिन्यात उत्तर भारतात जम्मू काश्मिरसह शेजारील राज्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात बर्फ पडल्याने वाहतुकीचे मार्ग बंद झाले होते. या वातावरणात सुधारणा झाली असली तरी याचे परिणाम देशातील उत्तर भागात जाणवू लागले आहे.
याच काळात पुर्व किनारपट्टी व पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाने मोठा फटका बसला होता. हे चक्रीवादळे गेल्यानंतर पुन्हा पश्चिम किनारपट्टीवर दोन चक्रीवादळे आल्यानंतर चार दिवसांपुर्वी मुंबईसह कोकणपट्टीत बेमोसमी पाऊस झाला. अशा लागोपाठच्या घटनांमुळे नोव्हेंबरमध्ये येणारी थंडीचे आगमन लांबले होते. मात्र, आता शनिवारपासून थंडीची चाहुल लागली आहे.
राज्यात पारा तीन ते चार अंशाने खाली आल्याने थंडीस प्रारंभ झाला आहे. शनिवारनंतर आज रविवारी नागपूर येथे सर्वात कमी ११.८ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच चार दिवसांपुर्वी नाशिकचा पारा २० अंशावर असतांना शनिवारी १४.२ अंशावर आला होता. काल नाशिकचा पारा १३ अंशावर खाली घसरला. वाढत्या थंडीमुळे लांबलेल्या पेरण्यांना प्रारंभ झाला आहे.
विदर्भात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याने पारा ११ ते १४ अंशावर आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा १३ ते १४ अंशाच्या दरम्यान आला आहे. आज गोंदीया १२, यवतमाळ १२.४, अकोला १२.९, वर्धा १३.४, औरंगाबाद १३.५, जळगांव १३.६, मालेगाव १४, महाबळेश्वर १४.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे.
Post a Comment