शेततळ्यातील मोती संवर्धन….
माय अहमदनगर वेब टीम
शेततळ्यामध्ये मत्स्यपालनासोबतच मोतीसंवर्धनसुद्धा करता येते. मोती संवर्धनातून मिळणाऱ्या मोत्यांपासून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर मोतीसंवर्धन करण्याचा प्रयत्न करावा. यात यश आल्यावर पुढे व्यावसायिक तत्त्वांवर मोतीसंवर्धन करावे, जेणेकरून नुकसान होणार नाही.
कृत्रिमरीत्या मोतीसंवर्धन चीन व जपान या ठिकाणी जास्त प्रमाणात होते. भारतात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर अॅक्वाकल्चर, भुवनेश्वर, ओरिसा येथे मोतीसंवर्धनावर बरेच प्रयोग सुरू आहेत. तसेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, वर्सोवा, मुंबई, पंतनगर विद्यापीठ या ठिकाणीसुद्धा कृत्रिमरीत्या मोतीसंवर्धनाचे प्रयोग सुरू आहेत. याच आधारावर सायन्स कॉलेज, नांदेड येथे मोतीसंवर्धनावर संशोधन करण्यात अाले. नांदेड परिसरातील तलावात प्रामुख्याने लॅमेलिडन्स, मारजिन्यालिस, लॅमेलिडन्स कोरिऍनस आणि पॅरेसिया कोरूगेटा हे शिंपले सापडतात. हे शिंपले तलावातून गोळा करून प्रयोगशाळेत ठेवले जातात. हे शिंपले मोतीसंवर्धनासाठी वापरले जातात.
शिंपल्यांचा उपयोग मोतीसंवर्धनाव्यतिरिक्त कॅल्शिअम तयार करण्यासाठी व काही ठिकाणी खाद्य म्हणूनसुद्धा केला जातो. मांसाहारी माशांना खाद्य म्हणून या शिंपल्यांचा उपयोग होतो. जलाशयात शिंपले हे नैसर्गिकरीत्या मोती तयार करतात. यात प्रामुख्याने समुद्रातील शिंपले होत. समुद्रातील मोतीसंवर्धनाचे क्षेत्र हे प्रदूषित झाल्यामुळे नैसर्गिकरीत्या मोती तयार करणाऱ्या शिंपल्यांची संख्या कमी होत असून, मागणी जास्त प्रमाणात आहे.
मोती तयार होण्याची प्रक्रिया
सुरुवातीला शिंपले (कालव) गोळा केले जातात. कालवच्या अंगावर कवच असतात. कालवचे शरीर अतिशय मऊ असते. मिटलेल्या दोन कवचांमध्ये मोती मिळवण्यासाठी न्यूक्लीअस सोडला जातो. न्यूक्लीअस म्हणजे शिंपल्यांचाच एक लहानसा तुकडा असतो. हा न्यूक्लीअस कालवला सतत टोचत राहतो. न्यूक्लीअस टोचू नये म्हणून कालव अापल्या शरीरातून स्राव सोडतो. कालवने सोडलेला हा स्राव न्यूक्लीअसभोवती जमा होत राहतो अाणि यापासूनच मोती तयार होतो. ज्या अाकाराचा न्यूक्लीअस त्याच अाकाराचा मोती तयार होतो.
मोतीसंवर्धनासाठी काही महत्त्वाच्या बाबी
१० गुंठ्यांपासून १ एकरपर्यंत शेततळ्यामध्ये मोतीसंवर्धन करता येते.
तळ्याची खोली १.५ ते २ मीटर असावी. शेततळ्याला अस्तरीकरण केले किंवा नाही केले तरी चालते. तळ्यात पाणी फक्त १ मी. खोलीपर्यंत असावे.
तळ्यात शैवाल असावे, पाण्याचा सामू साधारणपने ७.० ते ८.० असावा.
पाण्याचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत असावे. विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ४-८ पीपीएम, पाण्याची कठीणता ही ६९ पीपीएम, अाणि कॅल्शिअमचे प्रमाण २०-३० पीपीएम असावे.
शिंपल्यांच्या वाढीसाठी कॅल्शिअम महत्त्वाचे असते. ज्या शेततळ्यात आपण मोतीसंवर्धन करणार आहोत, त्या तळ्यात सेंद्रिय व असेंद्रिय खताचा वापर करावा. ज्यामुळे तळे सुपीक होईल आणि त्यात शिंपल्यांसाठी लागणारे शैवाल वाढेल. त्यामुळे शिंपल्यांना बाहेरील खाद्यपदार्थांची गरज लागणार नाही.
मोतीसंवर्धनासाठी योग्य वेळ ?
मोतीसंवर्धन वर्षभरात केव्हाही करता येते, मोतीसंवर्धनासाठी तापमान कमी असायला हवे. फक्त एप्रिल, मे महिन्यात तापमान जास्त असते. कमी तापमानात शिंपले शस्त्रक्रियेच्या तणावामधून लवकर बाहेर पडतात आणि मोती तयार करण्यास सुरवात करतात. पर्यावरणाचा ताण हा हिवाळ्यात कमी असतो, त्यामुळे शिंपल्यांचे मृत्यूचे प्रमाणही कमी होते. साधारणपणे शेततळ्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत शिंपले सोडावेत.
व्यवस्थापन
शिंपले शेततळ्यात सोडल्यानंतर १५ दिवसांनंतर शिंपल्यांचे जाळे स्वच्छ करावे. शिंपले सतत अन्न ग्रहण करत असतात. त्यामुळे त्यांच्या जाळीवर शैवाल जमा होते. जमलेले शैवाल वेळोवेळी स्वच्छ करावे लागते, जेणेकरून त्यांना श्वसनासाठी त्रास होणार नाही. वेळोवेळी जाळीची पाहणी करून मेलेले शिंपले जाळीतून बाहेर काढावेत, मेलेल्या शिंपल्यांच्या निरीक्षणावरून मोती तयार झालेत, की नाहीत याचा अंदाज करता येतो.
मोती तयार करण्याचे प्रकार
मोती तयार करण्यासाठी शिंपल्यांमध्ये दोन प्रकारे न्यूक्लीअस सोडला जातो. पहिल्या प्रकारात न्यूक्लीअस हा शिंपल्याच्या गोन्याडमध्ये सोडला जातो. यामध्ये गोन्याड शस्त्रक्रियेद्वारे कापून त्यात न्यूक्लीअस सोडून शिंपला पुन्हा पाण्यात सोडला जातो. या पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान झालेली इजा काही शिंपले सहन करू शकत नाहीत आणि ते मरतात. या प्रकारातून गोल आकाराचे मोती तयार होतात.
दुसऱ्या प्रकारामध्ये न्यूक्लीअस हा शिंपल्याच्या मॅन्टल कॅव्हिटीमध्ये सोडला जातो. या पद्धतीमध्ये शिंपल्याचे तोंड उघडून अलगद उचलून त्यातच न्यूक्लीअस सोडला जातो आणि पुन्हा शिंपला पाण्यात सोडला जातो. या प्रकारात शिंपल्याला कुठल्याही प्रकारची इजा पोचवली जात नाही. त्यामुळे शिंपल्यांचा मृत्युदर हा कमी राहतो. या पद्धतींमधून अर्धगोल मोती मिळतात.
शिंपले शेततळ्यात मोतीसंवर्धनासाठी टाकत असताना नायलॉनची पिशवी वापरतात. तिचा आकार १२ सें.मी. x ३० सें.मी. (१ सें.मी. जाळीचा आकार) असावा. दोन शिंपले प्रतिपिशवी. प्रत्येक पिशवी १ मी. खोलीपर्यंत पाण्यात अडकवावी. उन्हाळ्यात ही पिशवी २ मी. खोलीपर्यंत ठेवावी. २५ गुंठ्यांत अंदाजे २०,००० ते ३०,००० पर्यंत शिंपले साठवता येतात.
तयार झालेले मोती कसे काढावेत
दर १५ दिवसांच्या पाहणीनंतर मोती कितपत तयार झाले अाहेत याचा अंदाज येतो. १२ महिन्यांच्या कालावधीनंतर शिंपल्यातून मोती काढले जातात. दोन्ही पद्धतींच्या शस्त्रक्रियेमध्ये शेवटी मोती काढताना शिंपल्यांना मारून त्याच्या गोन्याड अथवा मॅन्टलमधून मोती बाहेर काढला जातो.
मोत्याची गुणवत्ता कशी ठरवतात?
मोत्याची गुणवत्ता ही त्याचा आकार, वजन आणि त्याची चमक यावर ठरते. शिंपल्यात मोती तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मोती तयार करण्यासाठी शिंपल्याला बऱ्याच प्रक्रियेतून जावे लागते. त्यामध्ये तळ्यात असलेले खाद्यपदार्थ, पाण्याचे तापमान, पाण्याची गुणवत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम मोत्यावर होतो. मोती तयार झाल्यानंतर शिंपल्यांना स्वच्छ केले जाते. त्यानंतर धुण्याच्या सोड्याने स्वच्छ धुतले जाते, त्यामुळे मोत्यांवर चकाकी येते.
मोत्यांची श्रेणी
AAA – उच्च प्रतीचा, खूप चांगली चकाकी असलेला मोती.
AA – चांगल्या प्रतीचा, चांगली चकाकी असलेला मोती.
A – मध्यम दर्जाचा, चांगली चकाकी असलेला मोती.
B – चांगली चकाकी
NC – बाजारात किंमत नसणारा मोती.
मोतीसंवर्धनातून मिळणारे उत्पन्न.
समजा १००० शिंपले आपण मोतीसंवर्धनासाठी वापरले तर, प्रतिशिंपला १० रु. प्रमाणे १०,००० रु., नायलॉन जाळी ३०० रु. किलोप्रमाणे १५०० रु., खत १००० रु., १२ महिने कामासाठी लागणारा माणूस ६०,००० रु., नायलॉन दोरी ः ५०० रु., शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने १००० रु. यशाचा दर ६० टक्के गृहीत धरावा.
टीप - बाजारपेठेतील भावानूसार दर कमी जास्त होऊ शकतात.
Post a Comment